राज्यात 1 ऑगस्टपासून महसूल सप्ताहाचे आयोजन

0
14

महसूल सप्ताहाचा जनतेने लाभ घ्यावा -चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

मुंबई, दि. 30 : महसूल विभागाच्या वतीने 1 ऑगस्टपासून आयोजित
करण्यात आलेल्या महसूल सप्ताहाचा राज्यातील जास्तीत जास्त जनतेने
विशेषत: महिला खातेदारांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
राज्यात 1 ऑगस्ट हा दिवस ‘महसूल दिन’ म्हणून साजरा करण्यात
येतो. याअनुषंगाने राज्‍यात 1 ते 7 ऑगस्ट 2016 या कालावधीत महसूल
सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात महिलांच्या सक्षमीकरणासाठी
विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत सातबारा व आठ-अ उताऱ्यावर
नाव असलेल्या महिलांच्या सबलीकरणासाठी महसूल विभाग व्यापक जनसंपर्क मोहिम
राबवित आहे. या मोहिमेत शासनाच्या कृषि, सहकार, महिला व बालकल्याण या
विभागांमार्फत शेतकऱ्यांसाठी, विशेषत्वाने महिलांसाठी राबविल्या जाणाऱ्या
योजनांची माहिती, सल्ला आणि प्रोत्साहन देण्यात येणार आहे. तसेच महिला
खातेदारांच्या महसूल विभागाशी संबंधित असणाऱ्या अडी-अडचणी समजून घेऊन
त्यांचे त्याचठिकाणी निराकरण करण्यात येणार आहे. या सप्ताहाचा जनतेने लाभ
घ्यावा असे आवाहन महसूल मंत्री श्री. पाटील यांनी केले आहे.