‘एक देश, एक टॅक्स’ ही भूमिका काँग्रेसची, भाजपने श्रेय लाटू नये : विखे पाटील

0
25

वृत्तसंस्था
मुंबई दि.29- संसदेने मंजूर केलेले वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विधेयकाला महाराष्ट्रातूनही संमती देण्यासाठी राज्य विधिमंडळाचे एकदिवसीय विशेष अधिवेशन आज (साेमवारी) सुरुवात झाले आहे. या अधिवेशनात हे विधेयक मंजूर करण्याची केवळ अाैपचारिकता बाकी असून, शिवसेनेने विधेयकाला सशर्त पाठिंबा दिला आहे. दरम्‍यान, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोध करणार नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले.

ज्‍या मोदींनी जीएसटीला विरोध केला, तेच त्‍या बाबत आज आग्रही : धनंजय मुंडे
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे म्‍हणाले, ”काळाचा महिमा कसा असतो, ज्या मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना जीएसटीला विरोध केला, तेच देशाचे पंतप्रधान झाल्यावर जीएसटी बाबत आग्रही आहेत. राज्याच्या हिताला प्राधान्‍य देण्‍यासाठी जीएसटीला आमचा पाठिंबा असेल”, असेही म्‍हणाले.

कॉंग्रेसने श्रेय लाटू नये : राधाकृष्ण विखे पाटील
काँग्रेस पक्षच जीएसटीचा जनक काँग्रेस पक्षच आहे, त्यामुळे भाजपने या विधेयकाचे श्रेय लाटू नये, अशा शब्‍दांत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी भाजपचा समाचार घेतला.
जीएसटी विधेयक आणून आपण नवीन काहीतरी करतोय, असे भासवण्याचा केंद्रातील मोदी सरकारचा प्रयत्न आहे. मात्र, केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना 2010 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी जीएसटीची संकल्पना सर्वप्रथम मांडली होती. ‘एक देश, एक टॅक्स’ ही भूमिका काँग्रेसची आहे. त्यामुळे भाजपने या विधेयकाचे श्रेय लाटू नये’, अशी तोफ विखेंनी डागली.

मुनगंटीवार यांनी केले विधेयक सादर
राज्याचे अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जीएसटी विधेयक विधानसभेत सादर केले. यावेळी ते म्‍हणाले, ”भ्रष्टाचार संपवण्यासाठी GST महत्‍त्‍वाचे आहे. सध्‍या जी जीवघेणी स्‍पर्धा पाहायला मिळते ती GSTमुळे कमी होईल. शिवाय करप्रणालीत सूसुत्रता येण्यासाठी जीएसटी महत्त्वाचे आहे, असे ते म्‍हणाले. तसेच जीएसटीमुळे राज्य आणि मुंबई महापालिकेच्या अधिकारांवर कोणतीही गदा येणार नाही, असे आश्वासनही मुनगंटीवार यांनी दिले. जीएसटी समितीत राज्यांच्या प्रतिनिधींची संख्या जास्त असल्यामुळे राज्यांना डावलणे अशक्य आहे. तसेच मुंबईच्या हिताची जबाबदारी माझी असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.
नेमके का बोलावले अधिवेशेन ? जीटीएस विधेयक घटनादुरुस्ती विधेयक असल्यामुळे त्याला देशातील सर्व राज्यांच्या विधिमंडळांच्या सभागृहांची मंजुरीही आवश्यक आहे. त्याप्रमाणे वेगवेगळ्या राज्यातील विधानसभांमध्ये हे विधेयक मांडण्यात येत असून, त्याला मंजुरी देण्याची औपचारिक प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. दरम्यान, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी आयोजित या बैठकीला अजित पवार, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील यांच्यासह विविध आमदार उपस्थित होते.या विधेयकाबाबत काही गोष्टींबाबत सरकारकडून उत्तरं घेणार असून काँग्रेस या विधेयकाला विरोध करणार नसल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.