महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात अनुकंपा पदभरतीस मान्यता – बबनराव लोणीकर

0
32

मुंबई : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील (एमजेपी) लिपिक-टंकलेखक पद भरतीवरील निर्बंध शिथील करुन गट- क मधील लिपिक-टंकलेखकांच्या एकूण रिक्त पदांच्या १० टक्के पदांवर अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती करण्यास प्राधिकरणाच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.

श्री.लोणीकर म्हणाले, राज्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात गट- क ची १ हजार ४९३ इतकी मंजूर पदे असून, त्यापैकी ८९४ पदे भरण्यात आली आहेत. ५९९ पदे रिक्त आहेत. याउलट राज्यभरात एमजेपीअंतर्गत ५०५ अनुकंपा उमेदवार सध्या नेमणुकीच्या प्रतिक्षेत आहेत. यात गट-क साठी ३११ तर गट ड साठी १९४ अनुकंपा उमेदवार हे अर्हताप्राप्त आहेत. मागील काही वर्षात विविध प्रशासकीय कारणास्तव एमजेपीमधील अनुकंपा तत्त्वावरील पदभरती ही पूर्णत: थांबली होती. पण आता अर्हताप्राप्त अनुकंपा उमेदवारांना १० टक्के रिक्त जागांवर नियुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची तातडीने अंमलबजावणी केली जाईल, असे ते म्हणाले.

सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या निराधार कुटुंबास अनुकंपा तत्त्वाच्या आधारे दिलासा देण्याच्या हेतूने शासनामार्फत ही योजना राबविली जात असून एमजेपी कर्मचारी मात्र मागील काही वर्षापासून त्यापासून वंचित होते. आता यापुढील काळात ही पदभरती विनाविलंब केली जाईल, असे श्री.लोणीकर म्हणाले.