२ सप्टेंबरच्या संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई

0
9

गोंदिया,(berartimes.com) दि. ३० :- केंद्रीय व राज्य सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी संघटनांनी २ सप्टेंबर रोजी पुकारलेल्या संपात सहभागी होणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश आज राज्य शासनाने जारी केले आहेत.
देशभरातील ११ केंद्रीय कर्मचारी संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी २ सप्टेंबर रोजी देशव्यापी लाक्षणिक संप पुकारला आहे. या संपात राज्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचारी-शिक्षक संघटना समन्वय समितीही सहभागी होणार असून, या समितीने तशी नोटीस शासनाला दिली आहे. मात्र सरकारी, निमसरकारी कर्मचारी-शिक्षक संघटना समन्वय समिती या संघटनेस महाराष्ट्र नागरी सेवा(वर्तणूक)नियम, १९७९ मधील नियम क्रमांक २९ अन्वये शासन मान्यता नाही. या अनुषंगाने राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने संपकाळात शासकीय, निमशासकीय कामकाज सुरळीतरित्या पार पाडण्याच्या दृष्टीने सर्व मंत्रालयीन विभाग, तसेच त्यांच्या अधिपत्याखालील क्षेत्रिय कार्यालयांना काही उपाययोजना आणि कारवाई करण्याचे आदेश आज निर्गमित केले आहेत.
संपात भाग घेणे, ही बाब गैरवर्तणूक समजण्यात येईल व अशा कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, अशा प्रकारचे आदेश विनाविलंब निर्गमित करण्यात यावेत व ते सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना व्यक्तीश: निदर्शनास आणून द्यावे. विभागप्रमुख, कार्यालयप्रमुखांनी संप काळात आपले मुख्यालय सोडून जाऊ नये, कार्यालय नियमित उघडण्याची व बंद करण्याची योग्य व्यवस्था करावी, तसेच गरज भासल्यास पोलिसांचीही मदत घ्यावी, विभागप्रमुख, कार्यालयप्रमुखांनी आजपासून कोणत्याही कर्मचाऱ्यास रजा मंजूर करु नये, तसेच ‘काम नाही-वेतन नाही’, हे धोरण अवलंबावे. शिवाय संपाच्या दिवशी उपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची माहिती संबंधित मंत्रालयीन विभागांना दुपारी १२ वाजतापर्यंत पाठवावी, असे सक्त निर्देशही सामान्य प्रशासन विभागाने आज दिले आहेत.