मुख्यमंत्रीच्या हस्ते लोकराज्यच्या ‘आपले पोलीस’ विशेषांकाचे प्रकाशन

0
13

मुंबई, 02 : लोकराज्य सप्टेंबर 2016 च्या ‘आपले पोलीस’ या
विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे
सह्याद्री अतिथीगृहात झाले. या विशेषांकात महाराष्ट्र पोलीसांच्या
सामर्थ्यशाली आणि गौरवशाली कामगिरीचा विस्तृत आढावा घेण्यात आला आहे. या
अंकाचे विशेष संपादन गृह विभागाचे अपर मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी
केले आहे.

या प्रकाशन सोहळ्याला शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे,
पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, आमदार सर्वश्री. आशिष शेलार, अबु आझमी,
वारिस पठाण, अस्लम शेख, अमीन पटेल, माजीमंत्री नसीम खान, गृह विभागाचे
अपर मुख्य सचिव के. पी. बक्षी, प्रधान सचिव डॉ. विजय सतबीर सिंग,
नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर, पोलीस महासंचालक सतीश माथूर,
मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता, पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर,
परिवहन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, संचालक (माहिती व प्रशासन) तथा अंकाचे
प्रबंध संपादक देवेंद्र भुजबळ यांच्यासह पोलीस व विविध विभागांचे वरिष्ठ
अधिकारी उपस्थित होते.

या अंकात सायबर सुरक्षा प्रकल्प, क्राइम ॲण्ड क्रिमीनल
ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम, फिरते न्याय सहायक वैज्ञानिक पथक, रस्ते
सुरक्षा, सीसीटीव्ही यंत्रणा, सोशल मीडियावरील बदनामी, ऑनलाइन पोलीस
सेवा, नक्षलींवर नियंत्रण, महिलांची सुरक्षा, महिला सुरक्षा पथक-दामिनी,
कैद्यांची सुधारणा व पुनर्वसन, नागरी हक्कांचे संरक्षण, सामाजिक बहिष्कार
मुक्ती, पोलिसांसाठी घरे, तंटामुक्तीचे यश, ऑपरेशन मुस्कान, पोलीस
अधिकारी घडवणारी संस्था, पोलीस दलात कसा प्रवेश घ्याल ? आदी विषयांवर
उपयुक्त व माहितीपूर्ण लेखांचा समावेश करण्यात आला आहे.

हा विशेषांक उत्कृष्ट, वाचनीय आणि अत्यंत संग्रहणीय झाल्याची
प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.