धान खरेदी योजनेत स्पर्धात्मक ई टेंडरिंग पद्धतीचा वापर करावा- मुख्यमंत्री

0
5

मुंबई, दि. 2 : शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी वेळेत व्हावी आणि त्यांना त्याची रक्कम वेळच्या वेळी मिळावी, यासाठी ई-टेंडरिंगद्वारे स्पर्धात्मक पद्धतीने धान खरेदी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी येथे दिले.धान खरेदीसंदर्भात आज सह्याद्री राज्य अतिथीगृहात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी खासदार नाना पटोले, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी.के. जैन, पणन विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, अन्न,नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक निलिमा केरकट्टा, महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डी. के. जगदाळे,भारतीय अन्न महामंडळाचे राज्यातील महाव्यस्थापक सुधीर कुमार,उपमहाव्यवस्थापक हरिष, विभागाचे उपसचिव सतीश सुपे, वित्तीय सल्लागार व उपसचिव सत्यवान उबाळे आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून मार्केटिंग फेडरेशनच्या मार्फत शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी करण्यात येत आहे. परंतु वेळेत धान न उचलणे, रक्कम वेळेत न मिळणे अशा
तक्रारी शेतकऱ्यांकडून येत आहेत. त्यामुळे धानाची खरेदी विकेंद्रित खरेदी पद्धतीने ई-टेंडरिंगद्वारे करावी. यामध्ये खाजगी कंपन्यांचाही सहभाग झाल्यास स्पर्धा निर्माण होऊन धान खरेदी योजना सक्षम होईल. यासाठी केंद्र
शासनाकडे आवश्यक तो प्रस्ताव पाठवावा.

श्री. पटोले म्हणाले की, धान खरेदी योजना एकाच संस्थेमार्फत राबविण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळत नाहीत. तसेच धानाचीही लवकर उचल होत नसल्यामुळे राज्य शासनास आर्थिक तोटा होतो.त्यामुळे या खरेदी योजनेत खासगी कंपन्यांनाही सहभागी करून घ्यावे.प्रधान सचिव श्री. पाठक यांनी खरेदी योजनेची माहिती दिली.