मनोधैर्य योजनेतील मंजूर प्रकरणाचा लाभ 15 दिवसात वितरीत करा- पंकजा मुंडे

0
8
मुंबई : राज्यातील बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि ॲसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला व बालकांना मनोधैर्य योजनेअंतर्गत जिल्हा क्षती सहाय्य मंडळाने मंजूर केलेल्या प्रकरणाचा लाभ 15 दिवसात देण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दालनात मनोधैर्य योजनेतील मंजूर प्रकरणाच्या निधीबाबत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास विभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार, लेखा व कोषागार विभागाच्या प्रधान सचिव वंदना कृष्णा यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्रीमती मुंडे म्हणाल्या, राज्यातील मनोधैर्य अंतर्गत मंजूर प्रकरणातील लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी निधी उपलब्ध नसल्यामुळे निधीअभावी प्रलंबित होती. त्यासाठी वित्त मंत्री यांच्याकडे याविषयी चर्चा केल्याबरोबर त्यांनी तत्काळ निधी देण्याचे मान्य केले. यासंबंधी जिल्हाधिकारी यांना जिल्ह्यातील मनोधैर्य योजनेच्या उर्वरीत प्रकरणात तत्काळ निर्णय घेवून त्याची माहिती पाठविण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच चित्रा वाघ यांनी ट्रॉमा टीम कार्यरत व्हावी अशी सूचना केली. त्यावर श्रीमती मुंडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्या म्हणाल्या, मनोधैर्य योजनेत बलात्कार व बालकांवरील लैगिक अत्याचारप्रकरणी किमान दोन लाख व विशेष प्रकरणात कमाल तीन लाख रूपये देण्यात येतात. ॲसिड हल्ल्यात जखमी झालेल्या महिला व बालकास त्यांचा चेहरा विद्रुप झाल्यास अथवा कायमचे अपंगत्व आल्यास तीन लाख रूपये देण्यात येतात. तसेच ॲसिड हल्ल्यात इतर जखमा झालेल्या महिला व बालकास 50 हजार रूपये अर्थसहाय्य देण्यात येते. पीडित महिला व बालकांना व त्यांच्या वारसदारांना गरजेनुसार निवारा, समुपदेशन, वैद्यकीय मदत, कायदेशीर सहाय्य, व्यवसाय प्रशिक्षण यासारख्या आधारसेवा पुरवून त्यांचे पुनर्वसन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.