राज्यातील रुग्णालयातील कर्करोग उपचार विभाग सुसज्ज करा- सुधीर मुनगंटीवार

0
10

मुंबई, दि. 28 : कर्करुग्णांना वेळेत आणि योग्य उपचार मिळण्यासाठी
राज्यातील कर्करोग उपचार  विभाग सुसज्ज करावे, असे निर्देश वित्त व
नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
काल  मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण
मंत्री गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा
गाडगीळ यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.
कर्करुग्णांना उपचारासाठी लागणाऱ्या सुविधा व त्यासाठीची अत्याधुनिक
उपकरणे यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगून श्री. मुनगंटीवार
म्हणाले की, वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत असलेल्या वैद्यकीय
महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांसाठी 10 वाहने उपलब्ध करून देण्यासाठी
वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा तसेच राज्यातील वैद्यकीय
महाविद्यालये व रुग्णालयांच्या गरजांचा एकत्रित प्रस्ताव तयार करून तो
शासनाकडे पाठविण्यात यावा.
 बैठकीत वित्तमंत्र्यांनी चंद्रपूर-गोंदिया येथील वैद्यकीय
महाविद्यालयातील पदनिर्मिती, पदभरतीची प्रकरणे तत्काळ मार्गी लावावीत,
नांदेड, यवतमाळ, अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील
प्राध्यापकांना 50 टक्के व्यवसायरोध भत्ता देण्यात येतो तो
चंद्रपूर-गोंदिया येथील वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापकांना मिळावा,
यासाठी प्रस्ताव पाठवून त्यास मंजूरी घेण्यात यावी, अशा सूचनाही केल्या.