महानगरपालिका, जि. प. आणि पं. स. निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी 14 ऑक्टोबरपर्यंत नावे नोंदवा

0
15

 मुंबई, दि. 28: बृहन्मुंबईसह 15 महानगरपालिका, 26 जिल्हा परिषदा व 296 पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी नागरिकांनी 14 ऑक्टोबर 2016 पर्यंत मतदार यादीत नावे नोंदवावित, तसेच दुबार, स्थलांतरीत व मयत व्यक्तीची नावे वगळावित, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केले.
            श्री. सहारिया यांनी सांगितले की, बृहन्मुंबईसह 10 महानगरपालिका, 26 जिल्हा परिषदा व 296 पंचायत समित्यांची मुदत मार्च-एप्रिल 2017 पर्यंत संपत आहेत; तर पाच महानगरपालिकांची मुदत मे व जून 2017 मध्ये संपत आहे. त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी 1 जानेवारी 2017 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या तरूण-तरूणींना 14 ऑक्टोबर 2016 पर्यंत विधानसभेच्या मतदार यादीत मतदार म्हणून नाव नोंदविण्याची अंतिम संधी आहे. कारण 1 जानेवारी 2017 या अर्हता दिनांकावर आधारीत तयार होणारी विधानसभेचीच मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरली जाणार आहे.
            भारत निवडणूक आयोगातर्फे 16 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर 2016 या कालावधीत मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम राबविला जात आहे. त्याचे औचित्य साधून राज्य निवडणूक आयोगाने संबंधित जिल्हाधिकारी व महानगरपालिका
आयुक्तांना व्यापक प्रमाणावर जनजागृती मोहीम राबविण्याबाबत आदेश दिले आहेत. मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमात नवीन मतदारांची नावे नोंदविण्याबरोबरच मतदार यादीतील आपले नावाबाबत अथवा पत्त्यातील तपशिलांत
दुरूस्त्या करावयाच्या असल्यास त्यादेखील करता येतील. तसेच दुबार किंवा आपल्या कुटुंबातील मयत व्यक्तीचे नावदेखील वगळता येईल, असेही त्यांनी सांगितले.