प्रत्येक जिल्ह्याचा रोजगार व कौशल्य विकास आराखडा तयार करा- मुनगंटीवार

0
19

मुंबई, दि. 28 : प्रत्येक जिल्ह्याने त्यांच्या जिल्ह्याची वैशिष्ट्ये
आणि क्षमता लक्षात घेऊन जिल्ह्याचा रोजगार आणि कौशल्य विकास आराखडा तयार
करावा तसेच राज्यातील अधिकाधिक युवकांना स्वंयरोजगार सुरु करण्यासाठी
मुद्रा बँक योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध होईल यासाठी गांभीर्यपूर्वक प्रयत्न
करा, असे आदेश आज वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
आज मंत्रालयात वित्तमंत्र्यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी
नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, कौशल्य विकास आयुक्त विजय
वाघमारे, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या आर. विमला,
महाराष्ट्र राज्य बँकर्स समितीच्या वतीने महाराष्ट्र बँकेचे अतूल जोशी
यांच्यासह इतर वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.
मुद्रा बँकेचा थेट संबंध रोजगाराशी निगडित असल्याने हा विषय अतिशय
महत्वाचा आहे असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले की, प्रत्येक
जिल्ह्याने त्यांच्या जिल्ह्यात किती युवक बेरोजगार आहेत,  जिल्ह्यात
किती बँका आहेत, त्यांच्या शाखा कुठे कुठे आहेत, जिल्ह्यात कोणता रोजगार
सुरु केला तर तो यशस्वी होऊ शकतो, जिल्ह्याची लोकसंख्या विचारात घेऊन
त्यांच्या गरजा कशाप्रकारच्या आहेत याचा अभ्यास करून एक आराखडा तयारा
करावा, जिल्ह्यातील उद्योग आणि कंपन्यांशी चर्चा करावी, त्यांना नेमके
कशाप्रकारचे मनुष्यबळ हवे हे लक्षात घेऊन युवकांच्या कौशल्य विकासाला
चालना द्यावी.
राज्यात मुद्रा बँक योजनेअंतर्गत या आर्थिक वर्षात वर्षी  31 ऑगस्ट 2016
अखेरपर्यंत 10 लाख ७० हजार २६९ खातेदारांना  शिशू, किशोर आणि तरूण
गटांतर्गत एकूण ४१२९.८३ कोटी रुपयांचे कर्ज वितरण झाले आहे.
मानव विकास निर्देशांकामध्ये राज्यातील १२५ तालुक्यांचा समावेश होतो.
शिक्षण, आरोग्य आणि दरडोई उत्पन्न या तीन गोष्टींवर मानव विकास
निर्देशांक निश्चित केला जातो. मानव विकास निर्देशांक वाढवायचा असेल तर
तिथे कोणते रोजगार सुरु केले पाहिजेत याचे प्रस्ताव संबंधित
जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरीत पाठवावेत अशा सूचना ही त्यांनी दिल्या. मुद्रा
बँक योजनेमधून कृषी संलग्न उद्योगाना तसेच अन्न प्रक्रिया उद्योगांना
कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यासाठी कोणत्याही तारणाची आवश्यकता नाही हे
लक्षात घेऊन मुद्रा योजनेचा व्यापक प्रचार व प्रसार करा, योजनेच्या
लाभार्थींच्या यशकथा प्रसिद्ध करा असे ही ते म्हणाले.
कौशल्य विकास आणि मुद्रा बँकेचे कर्ज यांची सांगड घालून मुद्रा बँकेचा
लाभ राज्यातील अधिकाधिक लोकांपर्यंत- युवकांपर्यत जाऊ द्या, ज्या ठिकाणी
प्रशिक्षण केंद्र आहेत, कौशल्य विकास केंद्र आहेत तिथे लक्ष केंद्रीत
करून विद्यार्थ्यांना मुद्रा बँक योजनेची माहिती द्या त्यामुळे युवकांना
प्रशिक्षणानंतर उद्योग सुरु करून रोजगार मिळवणे व त्यासाठी कर्ज मिळवणे
सुलभ होईल.  योजनेची अंमलबजावणी करतांना जिल्हास्तरावर येणाऱ्या अडचणी
लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य बँकर्स समितीने आवश्यक त्या सुस्पष्ट सूचना
पुन्हा एकदा निर्गमित कराव्यात अशा सूचनाही वित्तमंत्र्यांनी दिल्या.

बैठकीत श्री. पोरवाल यांनी जिल्हानिहाय समित्यांची स्थापना, लाभधारकांची
संख्या, योजना राबविताना येणाऱ्या अडचणी, त्रूटी याचा आढावा घेतला.
योजनेच्या प्रचार प्रसिद्धीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असेही ते
म्हणाले.