कोलामार्क संवर्धन राखीवात रान म्हशी संवर्धनास प्रोत्साहन

0
50

मुंबई दि. 26 :  गडचिरोली जिल्ह्यातील कोलामार्क  संवर्धन राखीव क्षेत्रात रानम्हशीच्या संवर्धनास विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
राज्य वन्य जीव मंडळाची 12 वी बैठक आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार बंटी भांगडिया, आमदार सुधाकर देशमुख, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविण परदेशी, वन विभागाचे सचिव विकास खारगे, मुख्य वन सरंक्षक वनबल प्रमुख सर्जन भगत, मुख्य वन्यजीव संरक्षक श्रीभगवान यांच्यासह राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य आणि वन विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.
कोलामार्का हे गडचिरोली जिल्ह्यातील 180 चौ.कि.मी चे क्षेत्र 2013 मध्ये संवर्धन राखीव म्हणून घोषित करण्यात आले आहे. येथे लोकसहभागातून शासनाने केलेल्या वन व्यवस्थापनाच्या प्रयोगास यश मिळाले असून येथील रान म्हशींची संख्या 10 वरून 22 इतकी झाली आहे. आजमितीस जगामध्ये तीन हजार आठशे रानम्हशी आहेत.  भारतात याची संख्या 3 हजार 500 इतकी आहे यामध्ये महाराष्ट्र आणि छत्तीसगड येथील रान म्हशींची संख्या 200 च्या आसपास आहे अशी माहिती आज बैठकीत देण्यात आली. त्यामुळे दुर्मिळ  होत असलेल्या रान म्हशींच्या संवर्धनाला कोलामार्का  येथील प्रयोगात मिळालेले यश पाहता त्यास अधिक प्रोत्साहन दिले जावे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
आजच्या बैठकीत मुंबई महानगरपालिकेच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान,बोरिवली ते गोरेगाव-मुलूंड दरम्यान भूमीगत बोगदा तयार करण्याकरिताच्या भूतकनिकी सर्व्हेक्षणाच्या कामास मंजुरी देण्यात आली. तसेच ठाणे-बोरिवली या मार्गावर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनक्षेत्रातून जाणाऱ्या रोप वे च्या सर्व्हेक्षण आणि अन्वेषणाच्या कामास ही यावेळी मान्यता देण्यात आली. रोप वे ची ऊंची, त्यामुळे होणारा आवाज तसेच वन्यजीवांना त्रास होणार नाही  या गोष्टींचा विचार यात केला जावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. आजच्या बैठकीत अमरावती जिल्ह्यातील वडाळी तसेच पुणे जिल्ह्यातील जुन्नर बिबट सफारीच्या निर्मितीस ही मान्यता देण्यात आली.