मंचेरियल-सिरोंचा-जगदलपूर आंतरराज्य महामार्ग उभारणी वेगात

0
7

गडचिरोली,दि.26: प्रस्तावित मंचेरियल ते जगदलपूर या राष्ट्रीय महामार्गावर इंद्रावती नदीवरील पूलाच्या कामासाठी आवश्यक असणाऱ्या जमीनी बाबतचा प्रस्ताव भूपृष्ट परिवहन मंत्रालयाने मंजूर केला असून या आंतरराज्य महामार्गाची उभारणी करण्याचा मार्ग खुला झाला आहे. जिल्हाधिकारी ए.एस.आर.नायक यांनी आज ही माहिती दिली.
या मार्गासाठी 5.61 हेक्टर जमीन संपादीत करणे बाकी होते. त्यासाठी जमीन मालकांना 17 लाख 26 हजार 750 रुपये हेक्टर दराने मंजूरी हवी होती. याबाबतचा प्रस्ताव 4 ऑक्टोंबर 2016 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयास पाठविण्यात आला होता. त्याला मंत्रालयाने मान्यता दिली. याबाबतचा संदेश ई-मेलव्दारे सार्वजनिक बांधकाम विभागास नुकताच प्राप्त झाला.
या जमीन मालकांना येणाऱ्या दोन आठवडयात एकूण 96 लाख 26 हजार 68 रुपयांचा मोबदला दिला जाईल व त्याची रजिस्ट्री होईल. नंतर पुढील कामकाज होणार आहे.
तीन राज्यांना जोडणाऱ्या या मार्गावर सिरोंचा येथे गोदावरी नदीवर असलेल्या पुलाचे काम पूर्ण झाले असून येथे वाहतूक सुरु झाली आहे. सिरोंचा ते असरअल्ली मार्ग व्यवस्थित असून त्यापुढील 20 किलोमीटर मार्गाचे मजबुतीकरण करण्याचे काम सध्या सुरु आहे. पुढे नदी पात्रात कॉलम उभारणीचे काम वेगात सुरु आहे. या दोन्हीमध्ये ही जमीन प्राप्त होणे अद्याप बाकी होते.
याबाबत माहिती देताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रदीप खवले यांनी सांगितले की सध्या खुल्या झालेल्या आंतरराज्य महामार्गाच्या सिरोंचा येथील पुलाचे काम पूर्ण झाल्याने यावरील वाहतूक मोठया प्रमाणावर वाढली आहे.
महामार्गाने होणार प्रगती
या 67 किलोमीटरच्या महामार्गाने दक्षिण गडचिरोली भागाचा चेहरा-मोहरा बदलुन जाणार आहे. यापुढील काळात तेलंगाणा ते छत्तीसगड असा थेट संपर्क प्रस्थापित होईल. याचा व्यापार आणि उद्योगास खूप मोठा फायदा होणार आहे.
सिरोंचा ते मंचेरिअल मार्गावर वाहतूक वाढली असून येणाऱ्या काळात अहेरी ते हैदराबाद मार्गावर प्रवासी वाहतूक सूरु करण्याची शक्यता पडताळण्यात येत आहे. यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे याच आठवडयात सर्वेक्षण करण्यात येणार आहे