गोरेवाडा प्राणी संग्रहालयातील आफ्रिकन आणि इंडियन सफारी – मुख्यमंत्री

0
16

मुंबई, दि. 26 :   नागपूर येथील गोरेवाडा प्राणी संग्रहालयातील अफ्रिकन आणि इंडियन सफारी नोव्हेंबर 2017 पर्यंत सुरु करावी,  असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गोरवाडा प्राणी संग्रहालयाची आढावा बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस वन मंत्री सुधीर मुनगंटीवार,  मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविण परदेशी, वन सचिव विकास खारगे, मुख्य वन संरक्षक वनबल प्रमुख नागपूर सर्जन भगत, मुख्य वन्य जीव संरक्षक श्री भगवान यांच्यासह वन विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.
गोरेवाडा प्राणी संग्रहालयासाठी 451 कोटी रुपयांचा आराखडा निश्चित केला असून या प्रकल्पाचे काम चार वर्षांत पूर्ण करावयाचे आहे. त्या दृष्टीने आराखड्यात नमूद कामांना  आवश्यक त्या केंद्र शासनाच्या मान्यता मिळवून वेग देण्यात यावा असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले
या प्राणी संग्रहालयाचे एकूण क्षेत्र हे 564 हेक्टर असून आतापर्यंत येथे रेस्क्यू सेटर, संरक्षक भिंती (कंपाऊंड वॉल), नेचर ट्रेल,  गोरेवाडा
रिझव्ह – जंगल सफारी, वॉच टॉवर्स, नैसर्गिक अधिवासाशी संबंधित कामांसह वॉटर होल्सची कामे पूर्ण झाली आहेत. इंडियन सफारी अंतर्गत टायगर सफारी,बिबट सफारी,   चितळ, नीलगाय यासारख्या प्राण्यांची संमिश्र सफारी यांचा समावेश आहे. एकूण 145 हेक्टर क्षेत्रावरील या सफारीमधून नैसर्गिक अधिवासांमधील वन्यजीव पाहण्याचा आनंद पर्यटकांना घेता येईल.
या उद्यानातील चार कि.मी.च्या रोप वे च्या कामास ही आज तत्वत: मान्यता देण्यात आली. याचा विकास आराखडा तयार करून त्यास केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठवावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. प्राणी संग्रहालयातील 16 कि.मी रस्त्यांचे श्रेणीवर्धन करण्यास ही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सर्व ऋतूंमध्ये पर्यटकांना येथील चितळ, मोर,  बिबटे आणि सांबर यासारखे वन्यजीव पाहाता यावे हा त्यामागचा हेतू आहे.  प्राणी संग्रहालयातील व्हेटरनरी सर्जन पदे भरण्याबाबत आजच्या बैठकीत सूचना
देण्यात आल्या.