पोलीस विभागातील वाहनांना आता फिरता अंबर दिवा

0
12

मुंबई महापौरांना स्थिर लाल दिवा
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची माहिती
मुंबई, दि. 26 : राज्यातील विविध पदांना वाहनांवर वेगवेगळे दिवे अनुज्ञेय करण्यात आले आहेत. यात आता काही बदल करुन मुंबई महापौरांना स्थिर लाल दिवा (फ्लॅशरविना लाल) तर पोलीस विभागातील वाहनांना फिरता अंबर दिवा (फ्लॅशरसह अंबर दिवा) अनुज्ञेय करण्यात आला आहे. याशिवाय दिवा वापरण्यासाठी काही नवीन पदांचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज येथे दिली.

मंत्री श्री. रावते म्हणाले की,आतापर्यंत अंमलबजावणीच्या कर्तव्यासाठी वापरली जाणारी परिवहन, राज्य उत्पादन शुल्क आणि वने या विभागांची वाहने,एस्कॉर्ट तथा पायलट कार म्हणून वापरली जाणारी वाहने आणि कायदा व सुव्यवस्थेसाठी वापरण्यात येणारी पोलीस विभागातील वाहने यांना स्थिर निळा दिवा किंवा लाल-निळा-पांढरा असा दिवा होता. पण अंमलबजावणीच्या कर्तव्यासाठी तसेच कायदा, सुव्यवस्थेसाठी वापरण्यात येणारी वाहने यांना तात्काळ मार्ग उपलब्ध होण्यासाठी या वाहनावरील स्थिर निळा दिवा सहज नजरेस
पडत नसल्याने क्षेत्रीय यंत्रणेकडून अंबर दिवा देण्याबाबतची मागणी होती. त्यामुळे आता या वाहनांना फिरता अंबर दिवा (फ्लॅशरसह अंबर दिवा) अनुज्ञेय करण्यात आला आहे.
शासनाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, पोलीस महासंचालक, जिल्हा परिषद अध्यक्ष, अ आणि ब वर्ग महापालिकांचे महापौर, महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त यांना स्थिर (फ्लॅशरविना) अंबर दिवा देण्यात आला होता.आता त्याऐवजी या पदांना फिरता अंबर दिवा (फ्लॅशरसह अंबर दिवा) अनुज्ञेय करण्यात येत आहे. तसेच या प्रवर्गामध्ये आता प्रधान सचिव किंवा सचिव पदावर नियुक्त होण्यास पात्र समकक्ष अधिकारी, मुंबई उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक, उच्च न्यायालयाचे न्यायाधिश यांना समकक्ष असलेले
न्यायाधिकरणातील अध्यक्ष व सदस्य तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी या नवीन पदांचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहितीही मंत्री श्री. रावते यांनी दिली.

शासकीय, निमशासकीय सेवेतील अग्निशमन दलाचे आग विजवणारे बंब, बचाव कार्यासाठी वापरली जाणारी मोठी शिडी असणारी वाहने यांना फिरता लाल दिवा (फ्लॅशरसह लाल दिवा) अनुज्ञेय करण्यात येत आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेसाठी वापरली जाणारी उपविभागीय दंडाधिकारी, तालुका दंडाधिकारी यांच्या शासकीय वाहनांना आता स्थिर निळ्या दिव्याऐवजी स्थिर अंबर दिवा (फ्लॅशरविना अंबर दिवा) अनुज्ञेय करण्यात आला आहे. हा वापर त्यांना त्यांच्या अधिकार क्षेत्रापुरता करता येऊ शकेल.

परिवहन आयुक्त हे दिवा विहित केलेल्या वाहनांना दिवा सुविधेच्या संदर्भात आरएफआयडी युक्त स्टिकर देणार आहेत. हे स्टिकर वाहनाच्या पुढील बाजुच्या काचेवर (विंड स्क्रिनवर) चिकटविणे बंधनकारक असेल, अशी माहितीही मंत्री श्री. रावते यांनी दिली. या नियमावलीचा भंग केल्याचे आढळून आल्यास असे वाहन तात्काळ जप्त करुन फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

काही महत्वाच्या शासकीय बाबीसाठी भाडेतत्वावर घेतलेल्या वाहनावर लावलेला दिवा कायदेशीर होत नाही. म्हणून अशा भाडे तत्वावर घेतलेल्या वाहनांवर
दिवा लावण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालय किंवा प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडून त्याप्रकारे स्टिकर्स देण्याची कार्यपद्धती आखण्यात येणार आहे, अशी माहितीही मंत्री श्री. रावते यांनी दिली.

पोलीस यंत्रणेची एस्कॉर्ट, पायलट अशी वाहने वगळता इतर अधिकारी, पदाधिकारी यांच्या वाहनांना मंजूर केलेला लाल किंवा अंबर दिवा हा वाहनाच्या टपावर समोरच्या भागामध्ये बसवावा. तसेच असा दिवा गोल दिवा असावा, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच शासकीय वाहनांना फिरता किंवा स्थिर लाल किंवा अंबर दिवा मंजूर केला असला तरी असा दिवा दिवसा चालू करुन वापरणे योग्य नाही. फक्त रात्री असा दिवा वापरणे आवश्यक आहे, अशा सूचना देण्यात येत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश विचारात घेऊन या सुधारणा करण्यात आल्या आहेत, असे मंत्री श्री. रावते यांनी सांगितले.