ओबीसींच्या हक्कांसाठी राज्यकर्त्यांची झोप उडवा- डॉ. खुशाल बोपचे

0
9

अर्जूनी मोरगाव येथून ओबीसी जनचेतना यात्रेला प्रारंभ

अर्जुनीमोर- जो समाज जागा झाला, त्याला त्याचे अधिकार मिळाले. मात्र, देशातील ६५ टक्के ओबीसी समाज आजही नागवला जात आहे. देशाची अर्थव्यवस्था सांभाळणाऱ्या या समाजाला त्याचे अधिकार राज्यकर्त्यांनी अद्यापही दिले नाही. तो आजही दारिद्र्यात खितपत पडला आहे. मुलांना शिक्षणाची सोय नाही, युवकाला रोजगार नाही, वृद्धांना पेंशन नाही, सत्तेत योग्य वाटासुद्धा नाही. आपल्या उत्पादनाचे भाव ठरविण्याचा अधिकार ओबीसीला नाही. देशातील जनतेची भूक भागवून अन्नधान्याचे कोठार भरणाऱ्या ओबीसींचे मात्र हालहाल आहेत. आपण कुठवर राज्यकर्त्यांच्या दयेवर राहायचे. आपले हक्क व अधिकार आपल्याला मिळवायचे असतील तर आता स्वस्थ बसून चालणार नाही. मागून कधीही मिळत नसते, आपला अधिकार हा हिसकावल्याशिवाय कोणी देणार नाही. एससी-एसटी व ओबीसीत भांडणे लावण्याचे काम सर्वत्र सुरू आहे. परंतु, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सर्वांत मोठा त्याग हा ओबीसींसाठी केला, याची जाणीव आपल्याला ठेवावी लागेल. बाबासाहेबांनी ओबीसींच्या हक्कांचे संरक्षण करणारे ३४० कलम संविधानात आधी लिहिले. आपल्या भावी पिढीच्या भविष्यासाठी ओबीसी बांधवांनी येत्या ८ डिसेंबरला नागपूर अधिवेशनावरील महामोर्च्यात आपल्या कुटुंबासकट सामील होऊन राज्यकर्त्यांची झोप उडवावी, असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजकीय समन्वयक डॉ. खुशाल बोपचे यांनी जनचेतना यात्रेच्या शुभारंभप्रसंगी काल शनिवारी(ता.२६) अर्जूनी मोरगाव येथे केले.

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात संविधान दिनाचे औचित्य साधून ओबीसी जनचेतना यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार नाना पटोले यांचे हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे निमंत्रक प्रा. बबनराव तायवाडे, ओबीसी महासंघाचे गोंदिया जिल्हाध्यक्ष  बबलू कटरे, मार्गदर्शक खेमेंद्र कटरे, मनोहर चव्हाण, जि.प. सदस्य किशोर तरोणे, अमर वऱ्हाडे, शेषराव गिऱ्हेपुंजे, डॉ.श्यामकांत नेवारे, डॉ.गजानन डोंगरवार, प्रा.नाकाडे, प्राचार्य यशवंत परशुरामकर, प्रमोद लांजेवार, जीवन लंजे, मुकेश जायस्वाल, शीला पटले, सुनीता हुमे, चित्रलेखा मिश्रा, रघुनाथ लांजेवार, नारायण भेंडारकर, राजेश चांदेवार, सुरेश भदाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, संविधान देशाचा पवित्र ग्रंथ आहे. दलित आणि शोषित पीडितांना राजकीय, आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार घटनेने दिला. डॉ.बाबासाहेबांनी एस.सी., एस.टी. प्रमाणेच कलम ३४० नुसार ओबीसींना समान हक्कांची तरतूद घटनेत केली. मात्र, मूठभर स्वार्थी लबाडांनी बहुजनांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवले. ही लढाई आता हक्क मागण्याची आहे. आम्हाला भीक नको आमचे अधिकार हवेत, असे ही ते यावेळी म्हणाले. पटोले यांनी नागपूरच्या महामोर्च्याच्या माध्यमातून जो पर्यंत आपली ताकद दाखविणार नाही,तो पर्यंत या राज्यकर्त्यांना सुद्धा जाग येणार नाही,असे सांगून मोच्र्यात अधिकाअधिक संख्येने जाऊन आपली ताकद दाखवून देण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी बोलताना केले.

प्रा.तायवाडे यांनी १९३१ च्या इंग्रज राजवटीत ओबीसी जनगणना झाली होती. मात्र, स्वतंत्र भारतात गेल्या ७० वर्षात जनगणना झाली नाही. ओबीसींना ३४० नुसार हक्क मिळाले नाही. आम्ही कधीच एकत्र येत नसल्याचा फायदा उच्चजातीतील राज्यकर्त्यांनी उचलून ओबीसींची सर्व संपत्ती आपल्या लोकांना वाटून टाकली. आपले हक्क व आपले अधिकार आपल्याच मिळवावे लागतील,त्यासाठी महामोर्च्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाची सुरवात संविधान अर्पण प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी २६/११ हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली देखील वाहण्यात आली. जिल्हाध्यक्ष बबलू कटरे यांनी उपस्थितांना संविधानातील प्रास्ताविकाचे वाचन केले, प्रास्ताविक ओबीसी संघर्ष कृती समितीचे प्रमुख मार्गदर्शक खेमेंद्र कटरे यांनी केले. संचलन ओमप्रकाशसिंह पवार यांनी तर उपस्थितांचे आभार गिरीश बागडे यांनी केले. दरम्यान,जनचेतना रथयात्रेला डॉ. खुशाल बोपचे व इतर मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून जनचेतना यात्रेचा शुभारंभ करताना केला. ही रथयात्रा संपूर्ण जिल्ह्यात भ्रमंती करणार आहे.