पोलीस पाटलांचे मानधन वाढवण्याबाबतचा प्रस्ताव तात्काळ सादर करा-गृह राज्यमंत्री केसरकर

0
14

मुंबई, दि.01 : राज्यातील पोलीस पाटलांचे सध्याच्या तीन हजार रूपये असलेले मानधन वाढविण्याचा प्रस्ताव गृह विभागाने तयार करून तात्काळ वित्त विभागाकडे सादर करण्याचे निर्देश गृह (ग्रामीण) राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दि.30 रोजी दिले.
मंत्रालय येथील दालनात राज्यातील पोलीस पाटलांचे मानधन वाढविणे तसेच इतर प्रलंबित मागण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी श्री.केसरकर बोलत होते.यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रभात कुमार,वित्त विभागाचे उपसचिव ज.अ.शेख,गृह विभागाचे उपसचिव श्री.अजेटराव,सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव सु.ह.उमराणीकर तसेच महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष महादेव नागरगोजे आदी उपस्थित होते.
राज्यातील हंगामी पोलीस पाटलांना कायम करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याचे श्री.केसरकर यांनी सांगितले. पोलीस पाटलांना शासन निर्णयाप्रमाणे राज्यपाल पुरस्कार देण्याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्वतंत्रपणे कळविण्यात येत आहे. त्याचबरोबर पोलीस पाटलांचे नुतनीकरण करतांना ज्यांची सेवा समाधानकारक त्यांचीच पुनर्नियुक्ती होईल. पोलीस पाटलांची तालुका स्तरावर कार्यशाळा घेऊन प्रशिक्षण देण्याबाबत पोलीस महासंचालक यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पोलीस पाटलांना तलाठी कार्यालयात कार्यालय मिळण्यासाठी महसूल मंत्र्यांना प्रत्यक्ष विनंती करणार असल्याचेही श्री.केसरकर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पोलीस पाटलांचे वय 60 वरुन 65 वर्षापर्यंत करणे आणि इतर विविध मागण्याबाबत नियमानुसार सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे श्री.केसरकर यांनी सांगितले. यावेळी पंढरपुरचे आमदार भारत भालके महाराष्ट्रपोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष मोहनराव शिंगटे, पंढरीनाथ पाटील, वर्धा पोलीस पाटील संघटनेचे सहसचिव अशोक वैरागडे, विदर्भ पोलीस पाटील संघटनेचे
अध्यक्ष दीपक पालीवाल तसेच चिंतामण पाटील आदी उपस्थित होते.