आत्राम यांच्या कवितेत जनवेदनेची भाषा – गेडाम

0
14

आमगाव,दि.01महाराष्ट्रातील सामाजिक जाणिवेच्या प्रथम आदिवासी कवयित्री म्हणून प्रसिद्ध असलेल्या उषाकिरण आत्राम यांची आदिवासी, दलित आणि तळागळातील लोकांच्या वेदनेची भाषा जाणते. त्यामुळे त्यांची कविता मुक्तपणे संवाद साधणारी संवादी कविता ठरते. त्यांचे शब्द वैभव, त्यातील आशय आणिअभिव्यक्ती, प्रतिमा आणि प्रतीके यामुळे त्यांच्या कवितेने नवनवे रूपबंध निर्माण केले आहेत, असे भाष्य कवी माणिक गेडाम यांनी केले.
‘युगसंवाद’ वाड्.मयीन व सांस्कृतिक भंडाराआणि आ.स्वि.ब. संस्था बोरकन्हार यांच्या संयुक्त विद्यमाने गायत्री मंदिर सभागृहात ‘कवी आणि कविता’ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रा. विनय लाऊतरे यांनी उषाकिरण आत्राम यांची प्रकट मुलाखत घेताना काव्यनिर्मिती मागील प्रेरणा, अनुभव, अनुभूती आणि आदिवासी समाजाची स्थिती-गती याबद्दल बोलते केले. तर कवी युवराज गंगाराम आणि प्रा. भगवान शोभणे यांनी उषाकिरण आत्राम यांच्या एकूण कवितेबद्दल आस्वादक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. स्त्रीला नवे आत्मभान देणारी, परिवर्तनाचे विचार रूजविणारी आणि एल्गार पुकारणारी कविता असल्याचे म्हटले.
प्रारंभी संविधान ग्रंथाला अभिवादन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी शाल, स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छाने उषाकिरण आत्राम यांचा माणिक गेडाम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अस्विबचे अध्यक्ष कवी लखनसिंह कटरे, गोंडावाणा दर्शनचे संपादक सुन्हेरसिंह ताराम, डॉ. अनिल नितनवरे, कवी आणि कविता या उपक्रमाचे संयोजक कवी प्रमोद अणेराव, युवराज गंगाराम, प्रा. विनय लाऊतरे, प्रा. भगवान शोभणे, युगसंवादचे सचिव प्रा. नरेश आंबिलकर प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन व आभार कार्यक्रमाचे आमंत्रक रमण पारधी यांनी केले.