जलयुक्त शिवार अंतर्गत दुरुस्तीसाठी 275 कोटी रुपयांचा आराखडा तयार- जलसंधारण मंत्री

0
9

नागपूर, दि. 9 : राज्यातील जुन्या पाझर तलावांची व केटीवेअरची गळती रोखण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येत असून त्यासाठी विभागाने 275 कोटी रुपयांचा आराखडा तयार केला असल्याची माहिती जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.
खानापूर जामगाव ता. परांडा, जि. उस्मानाबाद शिवारातील पाझर तलावांची दुरुस्ती करण्याबाबतचा प्रश्न सदस्य राहुल मोटे यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना प्रा. शिंदे बोलत होते.यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, राज्यातील जुन्या पाझर तलावांच्या दुरुस्तीसाठी 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर असून त्यापैकी 12 कोटी रुपये खर्च झाले आहेत. उर्वरित निधीतून या पाझर तलावाच्या निधीसाठी 10 लाख रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येतील.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राज्यभरात विविध कामे सुरु असून त्याचबरोबर जुन्या तलावांची गळती रोखण्यासाठी विभागामार्फत विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. यासाठी 275 कोटी रुपयांचा विशेष आराखडा विभागाने तयार केला आहे.जलयुक्त शिवार हा राज्य शासनाचा फ्लॅगशिप कार्यक्रम असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होत आहे. या योजनेअंतर्गत नवीन कामे सुरु करण्याबरोबरच जुन्या कामांच्या दुरुस्तीलाही प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती प्रा. शिंदे यांनी दिली.या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य सर्वश्री गणपतराव देशमुख, शिवाजीराव नाईक,शशिकांत शिंदे आदी सदस्यांनी सहभाग घेतला.

जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत 2017-18 चा विकास प्रकल्प आराखडा तयार करताना व गावांची निवड करताना लोकप्रतिनिधींना अवगत केले जाईल, अशी माहिती जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.जांबरुग ता. कर्जत, जि. रायगड येथे जलयुक्त शिवार योजनेच्या कामात झालेल्या गैरव्यवहाराबाबत प्रश्न सदस्य ॲड.आशिष शेलार यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देतांना प्रा. शिंदे बोलत होते.