आदिवासी विद्यार्थी संघाची आदिवासी प्रकल्प कार्यालयावर धडक

0
8

बुटीबोरी येथील नामांकित शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात निदर्शन

कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी बेले यांचे निलंबन

आदिवासी विकास आयुक्त येत्या बुधवारी देवरीत

देवरी- नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथील होलीक्रॉस कान्व्हेंटमधील विद्याथ्र्यांचे लैंगिक अत्याचार प्रकरणी आज देवरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर स्थानिक शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी प्रशासनाला जाब विचारण्यासाठी धडक दिली. या मोर्च्याचे आयोजन आदिवासी विद्यार्थी संघाच्या वतीने करण्यात आले होते. दरम्यान, प्रकल्प कार्यालयातील कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी बेले यांचेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून आयुक्त, आदिवासी विकास विभाग नाशिक हे येत्या बुधवारी देवरीच्या भेटीवर येत आहेत. उल्लेखनीय म्हणजे होलीक्रॉस ही शाळा शासनाने बंद केल्याने देवरी प्रकल्प कार्यालयामार्फत पाठविण्यात आलेल्या ६५ विद्यार्थ्यांना बोरगाव येथील शासकीय आश्रमशाळेत आणण्यात आले आहे.
सविस्तर असे की, आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशाने आदिवासी विभागामार्फत नामांकित शाळेत प्रवेश दिला जातो. या उपक्रमांतर्गत नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथील होलीक्रॉस इंग्लिश मीडियम हायस्कूल येथे आदिवासी विकास विभागामार्फत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेला. या शाळेत देवरीच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून ५७ मुले आणि ८ मुलींना प्रवेश दिल्या गेला. गेल्या काही दिवसापूर्वी या शाळेत विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे या शाळेची चौकशी करून त्या शाळेची मान्यता काढण्यात आली. देवरी कार्यालयामार्फत पाठविण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना काल रात्री बोरगाव येथील शासकीय आश्रम शाळेत आणण्यात आले. मात्र, या विद्यार्थ्यांना पालकांना याविषयी कोणतीही पूर्वसूचना दिली नसल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे.
दरम्यान, या प्रकरणात सहायक आदिवासी विकास आयुक्त, शिक्षण विस्तार अधिकारी आणि कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याने त्यांचेवर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीला घेऊन विद्यार्थी संघाने देवरीच्या प्रकल्प कार्यालयावर मोर्चा आणला. परंतु, प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी हे कार्यालयात अनुपस्थित असल्याने मोर्चेकरी विद्यार्थ्यांनी गोंधळ घालत जोपर्यंत या तिन्ही अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार नाही, तो पर्यंत जागा सोडणार नसल्याची भूमिका घेतली. परिणामी, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी व्ही. बी. बेले यांना आज तत्काळ निलंबित करण्यात आले. तरीही आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांचे समाधान न झाल्याने नाशिक येथील आदिवासी विकास आयुक्त हे येत्या बुधवारी (ता.२८) देवरीच्या भेटीवर येत असून आदिवासी संघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे पत्र प्रकल्प अधिकारी देवरी यांनी आंदोलन कर्त्यांना दिले.

कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी बेले अखेर निलंबित

आंदोलनकर्त्यां विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेत अप्पर आयुक्तांनी देवरीच्या प्रकल्प कार्यालयातील कनिष्ठ शिक्षण विस्तार व्ही.बी. बेले यांना आज तत्काळ निलंबित केले. श्री. बेले यांना बुटीबोरी येथील होलीक्रास या शाळेवर पालक सचिव म्हणून नेमण्यात आले होते. त्यांनी आपल्या कर्तव्यात कसून केल्याने त्यांना लैंगिक अत्याचार प्रकरणात त्यांचेवर ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले. निलंबन काळात बेले यांचे स्थानांतरण भंडारा येथील प्रकल्प कार्यालयात करण्यात आले आहे.
दरम्यान, आमगाव विधानसभेचे आमदार संजय पुराम यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.