कर्जमुक्तीचा निर्णय योग्यवेळी- देवेंद्र फडणवीस

0
20

मुंबई- राज्यात भाजप आणि शिवसेना सत्तेत सोबत राहतील, असा दावा करित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्हाला यश मिळाल्यामुळे विरोधक निराशेच्या गर्तेत अडकले आहेत, अशी कोपरखडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना मारली. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर असल्याचे सांगत कर्जमाफीवर सरकार सकारात्मक आहे. मात्र, कर्जमाफीचा निर्णय योग्यवेळी घेतला जाईल, असे अाश्वासन त्यांनी यावेळी दिले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आज झालेल्या चहापानाला व मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिवसेनेचे मंत्रीही उपस्थित होते. विरोधकांचा या कार्यक्रमावर बहिस्कार होता. विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नाहीत. विरोधी पक्ष हा निराश झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांतही लोकांनी आमच्यावर विश्वास दर्शविला. विरोधकांना मुद्दे उपस्थित करण्याची समज राहिली नाही. त्यांनी आधी आरसा बघावा, असा टोलाही त्यांनी यावेळी बोलताना लगावला.
मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले की, शेतकऱ्यांना नुकतीच रब्बी हंगामापोटी 894 कोटी रुपये भरपाई दिली. पीकविमा योजनेचा मोठ्या रकमेवर लाभ त्यांना मिळत आहे. 2015च्या खरिपात विदर्भातील ज्या जिल्ह्यांची पैसेवारी कमी होती, त्यांनाही केद्राने मदत दिली आहे. तुरीला यावेळी 5 हजार 50 रुपये भाव दिला जात आहे.नाफेडची अटही रद्द करण्यात आली आहे. तीन दिवसाचे आत शेतकऱ्यांचे चुकारे दिले जात आहेत. यंदा मोठ्या प्रमाणावर पीक आल्याने गोदाने भाड्याने घ्यावी लागत आहेत. कापसाचा हमी भाव बाजारभावापेक्षा अधिक असल्याने शेतकरी व्यापाऱ्यांकडे विक्री करीत आहेत.