19 मार्च रोजीकिसानपुत्र आंदोलनाचे उपोषण

0
7

मुंबई, दि. 14 –शेतकऱ्यांविषयी सहवेदना व्यक्त करण्यासाठी आणि शेतकरीविरोधी कायद्यांचा निषेध करण्यासाठी किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी राज्यव्यापी उपोषणाची हाक दिली आहे. 19 मार्च रोजी ज्यांना ज्यांना शक्य आहे, त्यांनी आपापल्या ठिकाणाहून या उपोषणात सहभागी होण्याचं आवाहनही अमर हबीब यांनी केलं आहे.
“19 मार्च रोजी होणारे उपोषण हे कोणा पक्षाचे नाही. कोणा संघटनेचे नाही. शेतकऱ्याविषयी संवेदना असणाऱ्या प्रत्येकाचे आहे. तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी बसायचे असेल तर जरूर बसा. बसायचे नसेल तर बसू नका. पण त्या दिवशी उपोषण मात्र करा.”, असं जाहीर आवाहन अमर हबीब यांनी महाराष्ट्रातील जनतेला केलं आहे.
“शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती आहे. या आपत्तीच्या वेळेस आपण आपले किरकोळ मतभेद बाजूला ठेवूया. सारा महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या बाजूने उभा ठाकला तरच मरणाच्या दारावर उभा राहिलेला शेतकरी मागे फिरेल आणि सरकारलाही शेतकरीविरोधी कायदे रद्द करणे भाग पडेल.”, असेही अमर हबीब यांनी सांगितले.किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी उपोषणाची हाक दिली असून, ते स्वत:ही या उपोषणात सक्रिय सहभाग घेणार आहेत. अमर हबीब हे यवतमाळ जिल्ह्यातील महागावमध्ये उपोषणाला बसणार आहेत. ज्यांना महागावला जाणं शक्य आहे, त्यांनी तिथेही सहभागी होऊन पाठिंबा दर्शवण्याचं आवाहन अमर हबीब यांनी केलं आहे.साहित्य आकादमी पुरस्कार विजेते लेखक आसाराम लोमटे हे या उपोषणात सक्रीय सहभागी होणार आहेत. शेती, शेतकरी, गरिबी यांबाबत भिडणारं लेखन करणाऱ्या लेखकाचा शेतकऱ्यांसाठीच्या उपोषणाला पाठिंबा मिळाल्याने आनंद वाटल्याच्या भावना अमर हबीब यांनी एबीपी माझा वेब टीमशी बोलताना बोलून दाखवल्या. शिवाय, मराठीतील प्रसिद्ध कवी-गीतकार गुरु ठाकूर यांनीही या उपोषणाला पाठिंबा दिला असून, तेही सहभागी होणार आहेत.मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा मोठ्या शहरांसह गाव-खेड्यांमधूनही शेतकरी आणि शेतकऱ्यांची मुलं-मुली या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सक्रिय सहभाग घेणार असल्याची माहिती अमर हबीब यांनी दिली.शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे अत्यंत निकटवर्तीय व विश्वासू सहकारी प्राचार्य सुरेशचंद्र म्हात्रे हेही या उपोषणात सहभागी होणार आहेत. 19 मार्च रोजी होणाऱ्या उपोषण आंदोलनाला त्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.शरद जोशी परदेशातून आल्यानंतर पुण्यातील आंबेठाण येथे शेती करू लागले. पुढे हेच आंबेठाण शेतकरी आंदोलनाचे केंद्र बनले. सुरेशचंद्र म्हात्रे हे याच ठिकाणाहून उपोषणात सहभागी होणार आहेत. बाहेर जाण्यास डॉक्टरांनी मनाई केल्याने सुरेशचंद्र म्हात्रे घरी राहूनच उपोषण करणार आहेत.