६ एप्रिलला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे सेवाग्राम येथे रेल्वेरोको

0
12

नागभीड दि. 13 : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी ६ एप्रिल रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने सेवाग्राम येथे रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी नेते व विदर्भ जनआंदोलन समितीचे संयोजक अ‍ॅड. वामनराव चटप यांनी येथे एका पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना चटप म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आता स्वतंत्र विदर्भ देण्याचे आश्वासन विसरले आहेत. स्वतंत्र विदर्भासाठी आतापर्यंत मोठ मोठी आंदोलने झाली. पण त्यांना ती दिसली नाही. म्हणूनच भाजपाचे केंद्रातील आणि राज्यातील सरकार मुके, बहीरे व आंधळ्याचे सरकार आहे. असे म्हटले तरी ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही. या सरकारला जनतेचे प्रश्न ऐकू येत नाही. आश्वासनाबाबत ते मुके झाले आहेत आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सरकारला दिसत नाही. म्हणूनच ६ एप्रिल रोजी सेवाग्राम येथे विदर्भातील जनता रेल्वे रोको आंदोलन करून रस्त्यावर उतरणार आहे.
अ‍ॅड. चटप पुढे म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी ३०२ चा गुन्हा नोंदवा अशी मागणी करणारे देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री आहेत. आता तर आणखी आत्महत्या वाढल्या आहेत. मग आता देवेंद्र फडणवीस यांचेवर ३०२ चा गुन्हा का नोंदविण्यात येवू नये? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.या पत्रकार परिषदेत विधानपरिषदेचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे, माजी मंत्री डॉ. रमेश गजभे, राम नेवले, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, हिराचंद बोरकुटे, रंजना मामर्डे आदींची उपस्थिती होती.