इंडोनेशियाच्या कौन्सल जनरलने केले ऊर्जामंत्र्यांचे कौतुक

0
7

नागपूर,दि.21-राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या अडीच वर्षात ऊर्जा विभागात धाडसी निर्णय घेत या खात्यात नवी ऊर्जा भरली. या गतिमान वाटचालीची माहिती देणार्‍या रेडियंट महाराष्ट्र या कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. इंडोनेशियाच्या कौन्सल जनरलने या पुस्तकातील निर्णयांची दखल घेत ऊर्जामंत्री बावनकुळे यांचे कौतुक केले आहे.
या पुस्तकाद्वारे राज्यातील ऊर्जा क्रांतीची दखल देशविदेशात घेतली जाऊ लागली असून मुंबईतील इंडोनेशियाचे कौन्सल जनरल सॉत सिरिंगोरिंगो यांनी या संदर्भात पाठविलेल्या पत्रात ऊर्जामंत्रालयाच्या उपक्रमांमुळे महाराष्ट्र हे देशातील इकॉनॉमिक पॉवर हाऊस म्हणून लवकरच पुढे येईल असा विश्वासही व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर ऊर्जा विभागाची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आली. त्यानंतर त्यांनी दररोज 18 ते 20 तास काम करण्याचा धडाका लावला. ऊर्जा बचतीपासून ते ऊर्जा निर्मितीतील खर्चात बचत करण्यापर्यंत अनेक उपाय योजले. तसेच भविष्यातील ऊर्जेची गरज आणि त्याचे नियोजन करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले. ऊर्जा मंत्री बावनकुळे यांनी कृषी फिडर वेगळे करण्याचा निर्णय कौन्सल जनरल यांनी अधोरेखित केला. हा निर्णय ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी गेम चेंजर ठरेल असेही कौन्सल जनरल यांनी म्हटले आहे.
सध्या पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीवर जगात सगळीकडे भर देण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात पर्यावरण पूरक ऊर्जेसाठी पवनऊर्जा, सौर ऊर्जा, कृषी टाकाऊ पदार्थ, उसाची चिपाडे या स्रोतांपासून 14400 मेगावॉट वीज निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे या पत्रातून नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य हे वीज तुटवड्याऐवजी मागणीपेक्षा जास्त वीजनिर्मिती करण्याकडे वाटचाल करत असल्याची बाब आनंददायी असल्याचेही पत्रात म्हटले आहे. रेडियंट महाराष्ट्र या पुस्तकाचे संपादन मराविमं सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी केले आहे.