वन्यजीव-मानव संघर्ष कमी करण्यासाठी वनाधिकाऱ्यांकडे अत्याधुनिक संसाधने गरजेची- राज्यपाल

0
8

मुंबई दि.२१:: मानव व वन्यजीव यांच्यातील संघर्ष अतिशय संवदेनशीलपणे हाताळताना क्षेत्रिय वनाधिकाऱ्यांच्या क्षमता विकसित करणे जेवढे अगत्याचे आहे.तेवढेच वन्यजीवांची सुटका करण्यासाठी त्यांच्याकडे अत्याधुनिक संसाधने गरजेची असल्याचे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केले.
मंत्रालयात राज्यापालांच्या हस्ते १४ व्यक्ती आणि संस्थांना छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच वन विभागात उत्कृष्ट सेवा करणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुमित मल्लिक, प्रधान मुख्य वन संरक्षक-वनबल प्रमुख सर्जन भगत, वन सचिव विकास खारगे, अभिनेता सयाजी शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
परंपरागत पद्धतीने भारतीय आदिवासी समाजाने वनांचे रक्षण आणि संवर्धन करण्याचे खूप मोठे काम केले आहे, असे सांगून राज्यपाल म्हणाले की, वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष कमी करताना वनाधिकाऱ्यांची सुरक्षितता ही तेवढीच महत्वाची आहे. तिकडेही लक्ष देण्याची गरज आहे. वन आणि वन्यजीव संरक्षणात आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मोठी मदत होत आहे. वनमोजणी असो की वन्यप्राण्यांच्या हालचाली यावर देखरेख ठेवण्यात तंत्रज्ञानाने मोठी झेप घेतली आहे. वेगवेगळ्या इझमचे दिवस मागे पडत असून आता जगाला फक्त एका “इझम” चे आकर्षण आहे ते म्हणजे टुरिझम. वन, वन्यजीव आणि वन पर्यटनात लोकांचा रस वाढतो आहे. पण वन पर्यटन करताना वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास विस्कळीत होणार नाही याची ही दक्षता घेण्याची गरज आहे. वन संरक्षणात आणि संवर्धनात शाळेतील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली वन विभाग महाराष्ट्रात अतिशय उत्तम काम करत असल्याचेही ते म्हणाले. वन व्यवस्थापनामध्ये गावकऱ्यांचा सहभाग वाढवून त्यांना उत्कृष्टपणे यात सहभागी करून घेतल्याबद्दल त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे कौतूक केले. तसेच पुरस्कारप्राप्त सर्व अधिकारी- कर्मचारी आणि संस्थांचे अभिनंदन केले.
वनालगतच्या गावांनी आणि लोकांनी साथ दिल्याने ना केवळ वनांचे जतन आणि संवर्धन झाले परंतू गावकरी वन्यजीवांच्या संरक्षणात सहभागी झाले. त्यामुळे शिकारीलाही आळा बसला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. वन पर्यटनाच्या माध्यमातून गावात वनांवर प्रेम करणाऱ्या, वन्यजीवांवर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या वाढते आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. यातून पर्यटनाला मिळणारी चालना लक्षात घेऊन वन पर्यटन धोरण आखणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पूर्वी संरक्षित वनक्षेत्रात सहभागी होण्यास लोकांचा विरोध होता. परंतू आता लोक स्वत: हून संरक्षित वनक्षेत्रात जाण्यास तयार आहेत. लोकाभिमुखतेतून सकारात्मकदृष्टीने वन विकास करण्यात वन विभागाला यश आल्याचे व हे परिवर्तनाचे मोठे पाऊल असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
माणसाला जीवन देणारे वृक्षधनुष्य पेलण्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या सहकार्याची गरज असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, २८ नोव्हेंबर २०१२ रोजी युनोने ठराव करून २१ मार्च हा दिवस जागतिक वन दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. गेल्यावर्षी वन आणि जल हा त्यांचा संकल्प होता यावर्षी वने आणि ऊर्जा संकल्प हाती घेऊन ते काम करत आहेत. पृथ्वीला पर्यावरण ऱ्हासाच्या संकटापासून वाचवण्याची वेळ आली आहे. वृक्ष लावा-पृथ्वी वाचवा हा संदेश ऑलिम्पिकने दिला आहे.आज ज्या व्यक्ती आणि संस्थांना छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने गौरविण्यात आले, अशा समाजासाठी त्याग करणाऱ्या लोकांची खरी गरज आहे असेही ते म्हणाले.
राज्याचे २० टक्क्याचे वनक्षेत्र ३३ टक्क्यांपर्यंत वाढवायचे असेल तर वन विभागासोबत सर्वांनी या कामात सहभागी झाले पाहिजे असे आवाहन मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी यावेळी केले. कार्यक्रमात अभिनेता सयाजी शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. वृक्ष लागवडीच्या कामात ५० हजार विद्यार्थ्याना सहभागी करून घेतले असल्याचे सांगतांना त्यांनी या कामात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी काही गुण देण्यात यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते बर्डस ॲण्ड मॅमल्स ऑफ नानज, अनटोल्ड लाईफ ऑफ बर्डस या वन विभागाच्या दोन पुस्तकांचे तसेच दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. आपल्या प्रास्ताविकात वन सचिव श्री. खारगे यांनी वन विभागाच्या महत्वाकांक्षी वाटचालीची माहिती दिली.