पर्यटन स्थळांची माहिती आता एका क्लिकवर

0
16

मुंबई दि.23 – 2017 हे वर्ष व्हिजीट महाराष्ट्र वर्ष म्हणून राज्य सरकारने जाहिर केल्यानंतर पर्यटन विभागाकडून पर्यटकांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करण्यावर अधिक भर देण्यात येणार असून त्यासाठी राज्यातील विविध पर्यटन स्थळांची माहिती एकाच क्लिकवर उपलब्ध व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाकडून टूरीझम मोबाईल ॲप च्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करण्यात आल्यामुळे राज्यातील पर्यटन स्थळांची माहिती आता क्लिकवर उपलब्ध होणार असल्याची माहिती राज्याचे रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
आज दि.23 रोजी ना.जयकुमार रावल यांच्या मंत्रालयीन दालनात एम.टी.डी.सी.मोबाईल ॲपचे अनावरण ना.रावल यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते, यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकिय संचालक के.एस.गोविंदराज तसेच पर्यटन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मोबाईल ॲपमध्ये पर्यटकांनी नोंदणी केल्यानंतर त्यांना सबंधीत पर्यटन स्थळाजवळील हॉटेल्स, रिसॉर्ट, हॉलीडे पॅकेजची माहिती, निसर्गरम्य स्थळे, महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांची माहिती, ई गाईडची सुविधा, तसेच नकाशा पाहून पर्यटनाच्या दृष्टीने नियोजन करता येणे सोपे होणार आहे.
यावेळी ना.रावल म्हणाले की, महाराष्ट्र राज्यात हिमालय सोडून सर्व काही आहे, राज्याला सुंदर समुद्र किनारा लाभला असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक गड किल्ल्यांचा वारसा आहे, तसेच पुरातण काळातील लेण्या, आदिवासी संस्कृती, वाघ्र प्रकल्प, नॅशनल पार्क, हिल स्टेशन असे नानाविध पर्यटन स्थळांव्दारे पर्यटकांचे भरपूर मनोरंजन होईल अशी पर्यटन स्थळे उपलब्ध आहेत, ही सर्व माहिती एकाच ॲपमध्ये उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असून या ॲपव्दारे रिसॉर्ट बुकिंगची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे, त्यामुळे राज्यातील पर्यटनाला नक्कीच वाव मिळेल असा विश्वास देखील पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी याप्रसंगी व्यक्त केला.