विधानसभेत विरोधकांचा बहिष्कार कायम; कामकाज ठप्प

0
8

मुंबई दि.२४: विधानसभा कामकाजावर विरोधकांचे बहिष्कार अस्त्र अद्याप कायम असतानाच राज्यातील निवासी डॉक्‍टरांच्या संपाच्या मुद्यावरून सत्ताधारी बाकांवरील आमदारांनीच आज (शुक्रवार) दोनदा कामकाज बंद पाडले. ‘काहीही करून डॉक्‍टरांचा संप मिटवा’ अशी मागणी आमदारांनी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत यासंदर्भात निवेदन केले.
‘डॉक्‍टरांच्या मागण्या मान्य करून आणि त्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करूनही त्यांनी संप मागे घेतला नाही. उपचारांविना रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. डॉक्‍टरांची ही कृती असंवेदनशील आहे. रुग्णांना ओलीस धरणे योग्य नाही. राज्य शासनाने आणखी किती संयम दाखवायचा? राज्यातील जनतेची तीव्र भावना लक्षात घेत तातडीने संप मागे घ्यावा, अन्यथा राज्य सरकार कायदेशीर कारवाई करेल,’ असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला. दरम्यान, आज दुपारी मुख्यमंत्र्यांनी डॉक्‍टरांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. या बैठकीनंतर संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली. उद्या (शनिवार) सकाळी 8 पासून सर्व निवासी डॉक्‍टर कामावर पुन्हा रुजू होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
‘डॉक्‍टरांना पुरेशी सुरक्षा देण्यासाठी पुढील पाच दिवसांत 700 सुरक्षा रक्षक देण्याचा निर्णय झाला आहे. तसेच, पुढील दहा दिवसांत उर्वरित सुरक्षा रक्षक पुरविण्याबाबत पोलिस दलाला सांगण्यात आले आहे. तत्पूर्वी सशस्त्र सुरक्षा रक्षक तैनात करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. आपत्कालीन विभागात रुग्णाच्या नातेवाईकांच्या प्रवेशावर मर्यादा, रुग्णालयांची सुरक्षा विषयक तपासणी आदी निर्णय घेण्यात आले आहेत,’ अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.