मोदींनी ओबीसी मंत्रालयाच्या मुद्द्यावर खासदार महोदयांना खडसावले

0
13

नवीदिल्ली (ता.1)- इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी (ओबीसी) स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची शक्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेटाळून लावत पूर्वविदर्भातील भाजपच्या एका खासदाराने यासंदर्भात प्रश्न विचारल्याने त्यांनी त्या खासदाराची चांगलीच कानउघाडणी केली.
घटनात्मक अधिकार असलेला ओबीसी आयोग स्थापन करण्याच्या निर्णयाबद्दल भाजपच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले. मात्र, भाजपच्या पूर्वविदर्भातील एका खासदाराने ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यासंबंधीचा प्रश्न विचारला होता.
सुशासनासाठी मंत्री आणि विभागांची संख्या आटोपशीर ठेवण्याच्या दृष्टीने मी कसोशीने काम करीत असताना ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण करण्याचा विचार आहे का, असा प्रश्न विचारला जावा, यावर ते नाराज दिसले. सदर खासदाराला पंतप्रधानांनी भाजपचा जाहीरनामा बघितली नाही का, असेही म्हटल्याचे कळते
महाराष्ट्र सरकारने ओबीसी मंत्रालय स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे. केंद्र सरकारही असाच विचार करीत आहे का, असा प्रश्न या खासदाराने उपस्थित केला असता पंतप्रधान मोदी नाराजीच्या सुरात म्हणाले की, खासदारांनाच महत्वाचे प्रश्न, मुद्दे कोणते यांची समज नसेल, तर प्रसारमाध्यमे अशा बाबींना ठळक प्रसिद्धी देतील, असेही म्हटल्याचे बोलले जाते.
महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मधील खासदारांना पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, रस्त्यावर उतरून संघर्ष आणि निदर्शने करण्याची ही वेळ नसून सामाजिक भावनेतून जनतेशी संपर्क साधण्याची ही वेळ आहे. सरकारच्या गेल्या तीन वर्षातील विविध योजनांचा,कल्याणकारी कार्यक्रमांच्या नीट अभ्यास करून जनतेपुढे गेले पाहिजे, असे सागंत पंतप्रधानांनी मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना मागासवर्गीय, आदिवासी आणि गरीब घटकांतील लोकांशी कसा संपर्क साधत असे, याचे काही दाखले ही दिले.
फारसे न बोलता पंतप्रधान मोदी यांनी खासदारांना इशारा दिला की, काळानुसार तुम्ही बदलने जरूरी आहे. राजकीय दृष्टीकोनातून राखलेल्या जनसंपर्कामुळे एक निवडणुक जिंकू शकता. अशा स्पष्ट शब्दातून पंतप्रधानांनी खासदारांना इशारा दिला. कल्याणकारी योजनांच्या लाभाबाबत आपापल्या भागात व्यवस्थित प्रचार केला जात नाही. आपापल्या मतदारसंघातील प्रकल्पाच्या कामांबाबत जाणीवपूर्वक पाठपुरावा करून काही सूचना कराव्यात, असेही त्यांनी सूचित केले.