कुक्कुट पालनाच्या विकासासाठी राज्यात स्वयम् प्रकल्प

0
9

मुंबई, दि. 18 -राज्याच्या ग्रामीण भागात परसातील कुक्कुट पालनास प्रोत्साहन देण्यासह आदिवासी उपयोजना क्षेत्रातील अंगणवाड्यांतील मुलांच्या आहारात अंड्यांचा पुरवठा करणे आणि त्यासोबतच आदिवासी कुटुंबांसाठी स्वयंरोजगार निर्मिती करण्याच्या उद्देशाने पुढील दोन वर्षांसाठी स्वयम् प्रकल्प राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
स्वयम् प्रकल्प हा राज्यातील ठाणे, पालघर व रायगड (कोकण विभाग), पुणे (पुणे विभाग), नाशिक, अहमदनगर, नंदुरबार, जळगाव, धुळे (नाशिक विभाग), अमरावती व यवतमाळ (अमरावती विभाग), नागपूर, गडचिरोली,गोंदिया, चंद्रपूर (नागपूर विभाग), नांदेड (लातूर विभाग) या 16 जिल्ह्यांत राबविण्यात येणार आहे. या जिल्ह्यांतील एकूण 104 एकात्मिक बाल विकास प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात प्रत्येकी एक युनिट याप्रमाणे 104 खासगी पक्षी संगोपन केंद्रे (मदर युनिट) स्थापन करण्यात येणार आहेत.प्रत्येक युनिटला 417 लाभधारकांना संलग्न करण्यात येणार असून या प्रकल्पांतर्गत एकूण 43 हजार 368 कुटुंबांना लाभ देण्यात येणार आहे.आदिवासी उपयोजना क्षेत्रातील अंगणवाड्यांतील मुलांच्या आहारात अंड्यांचा पुरवठा करुन कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न या प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
या प्रकल्पांतर्गत मदर युनिटच्या माध्यमातून शासकीय अथवा खासगी कुक्कुट पालन क्षेत्रातून एकदिवसीय देशी सुधारित जातीची पिल्ले प्राप्त करून त्यांचे चार आठवड्यांपर्यंत संगोपन केले जाईल. शासनाकडील पूर्वीचे 16 सघन कुक्कुट विकासगट आणि कृषी विज्ञान केंद्रे ही देखील मदर युनिट म्हणून काम करु शकतील. या प्रकल्पाचा एकूण खर्च 22 कोटी 55 लाख इतका असेल. तो 2017-18 आणि 2018-19 या कालावधीसाठी राबविण्यात येणार आहे.या प्रकल्पासाठी जिल्हास्तरीय समन्वय आणि तालुकास्तरीय प्रकल्प सनियंत्रण समिती स्थापन करण्यात येणार आहे. मदर युनिटधारक हा स्थानिक व आदिवासी प्रवर्गातून मात्र काही अपवादात्मक परिस्थितीत इतर प्रवर्गातून निवडण्यात येणार आहे. स्थानिक आदिवासी लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत लाभ देण्यासह अशा स्वरुपाचा लाभ हा आधार क्रमांकाशी जोडण्यात येणार आहे. हा प्रकल्प राबविण्यासाठी आदिवासी विकास विभाग, महिला व बालविकास विभाग, पशुसंवर्धन विभाग, ग्रामविकास विभाग (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.