भू संपादनाची कामे जुलै अखेर पूर्ण करुन रेल्वेमार्ग निर्मितीला गती द्या – मुख्यमंत्री

0
8

महाराष्ट्रात १ लाख ३६ हजार कोटी रुपयांची रेल्वे प्रकल्पांची कामे – सुरेश प्रभू

मुंबई, दि. 18 : राज्यात हाती घेण्यात आलेल्या अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ,वर्धा-नांदेड, वडसा-गडचिरोली इत्यादी नवीन रेल्वे मार्ग निर्मितीसाठीचे आवश्यक भूसंपादन येत्या जुलैअखेर पर्यंत पूर्ण करुन ही जमीन रेल्वेकडे हस्तांतरित करण्यात यावी. या रेल्वेमार्गाच्या निर्मितीचे काम गतिमान होईल यादृष्टीने नियोजन करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधीत विविध जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले.मुख्यमंत्री श्री. फडणवीस व केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी राज्यातील रेल्वे प्रकल्पांबाबत उच्चस्तरीय बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, महाराष्ट्रात साधारण १ लाख ३६ हजार कोटी रुपयांच्या विविध रेल्वे प्रकल्पांची कामे मंजूर किंवा सुरु असून ही सर्व कामे जलदगतीने पूर्ण करुन महाराष्ट्रात रेल्वेचे जाळे अधिक विकसित आणि सक्षम करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री श्री. प्रभू यांनी या बैठकीत दिली. या रेल्वे प्रकल्पांच्या विविध कामांना गती देण्यात यावी, असे निर्देश त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिले.

बैठकीस राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, राज्यमंत्री विजय देशमुख,आमदार आशिष शेलार, राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा, मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे मुख्यव्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय, मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्यासह राज्य शासनाच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी सर्वश्री डी.के. जैन, संजयकुमार, प्रवीण परदेशी, युपीएस मदान, नितीन करीर, आशिषकुमार सिंह, मनोज सौनिक, भूषण गगराणी, मिलिंद म्हैसकर आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय संबंधीत विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, वरिष्ठ अधिकारी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी होते.

अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ,वर्धा-नांदेड, वडसा-गडचिरोली या नवीन रेल्वे मार्गांसाठी जमीनीचे भूसंपादन अखेरच्या टप्प्यात आहे. अशा ठिकाणी उर्वरीत भूसंपादन येत्या जुलैअखेर पूर्ण करुन ऑगस्ट महिन्यात या रेल्वे मार्गांची कामे सुरु करण्यात यावीत, असे निर्देश त्यांनी यावेळी संबंधीत अधिकाऱ्यांना दिले.जयगड बंदर रेल्वेशी जोडण्याच्या दृष्टीने हाती घेण्यात आलेल्या मार्गाचे
काम तसेच चिपळूण-कराड रेल्वे मार्गाचे कामही प्राधान्याने हाती घेण्यात यावे, असे निर्देश यावेळी त्यांनी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या जमीनीच्या भूसंपादनाचे काम जलदगतीने करण्यात यावे. त्यानंतर रेल्वे विभागाकडे जमीनीचे हस्तांतरण झाल्यानंतर संबंधीत कामाच्या निविदा प्रसिद्ध करणे, प्रत्यक्षात प्रकल्पाचे काम सुरु करणे आदी कामांना रेल्वे विभागाने गती द्यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिले.

मुंबई उपनगर परिसरातील प्रवासी कसारा रेल्वे स्थानकावर उतरून तेथून पुढे वाहनाने नाशिक, शिर्डी, अहमदनगर इत्यादी ठिकाणी जातात. या प्रवाशांच्या सोयीसाठी कसारा उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या बाहेर एसटी महामंडळाचे बसस्थानक उभारल्यास प्रवाशांची मोठी सोय होऊ शकेल. यासाठी रेल्वेने एसटी महामंडळाला जागा द्यावी, अशी मागणी यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते
यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली. या बदल्यात नाशिक रोड रेल्वे स्थानक येथे रेल्वे विभागाला हवी असलेली एसटी महामंडळाची जागा हस्तांतरीत करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. यासंदर्भात तातडीने पडताळणी करुन निर्णय घेण्यात यावा, असे निर्देश रेल्वे मंत्री श्री. प्रभू यांनी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.