शिक्षण, आरोग्य, कृषी व पशू तसेच बांधकाम व अर्थ या समित्यांचे सभापतींना वाटप

0
13

नांदेड,दि.18 :जिल्हा परिषदेच्या विषय समितीचे वाटप 18 रोज मंगळवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात पिठासीन अधिकारी जि.प.अध्यक्षा यांच्या उपस्थितीत शिक्षण, आरोग्य, कृषी व पशू तसेच बांधकाम व अर्थ या समितीचे वाटप आज सभापतींना करण्यात आले.दुपारी 2 वाजता विशेष सर्वसाधारण सभेला जि.प.च्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पिठासीन अधिकारी जि.प. अध्यक्षा शांताबाई पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरूवात करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष समाधान जाधव, सभापती माधव मिसाळे, दत्ता रेड्डी, सौ. शिला निखाते, सौ. मधुमती कुंटूरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, वित्त लेखा विभागाचे अप्पासाहेब चाटे, सर्वसामान्य विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

या सर्वसाधारण सभेत उपाध्यक्ष समाधान जाधव यांना बांधकाम आणि अर्थ या खात्याची जिम्मेदारी तर कॉंग्रेसचे माधव मिसाळे यांच्याकडे बहुचर्चीत असे शिक्षण व आरोग्य खात्याची जबाबदारी तर राष्ट्रवादीच्या दत्ता रेड्डी यांच्याकडे कृषी आणि पशुसंवर्धन हे खाते देण्यात आले आहे. यावेळी गोजेगावकर यांनी स्थायी समितीसह विविध समित्यावरील सदस्यांची निवड ही बिनविरोध करण्यात यावी असा ठराव मांडण्यात आला. या ठरावास कॉंग्रेसचे गटनेते प्रकाश भोसीकर, शिवसेनेचे गटनेते प्रविण चिखलीकर व राष्ट्रवादीचे गटनेते विजय धोंडगे यांनी अनुमोदन दिले. समित्यावरील सदस्यांची निवडीचा अधिकारी अध्यक्षांना देण्यात आला आहे. लवकरच या निवडी होणार असल्याचेही सांगण्यात आले.

कक्षांच्या पाट्या बदलल्या, गाडीचा वाद चालूच
3 एप्रिल रोजी सभापतींची निवड करण्यात आली पण यांना खा तेवाटप करण्यात आले नाही. सभापती निवडीच्या दिवशी समाजकल्याण आणि महिला बालकल्याण हे दोन खाते त्याचदिवशी जाहीर केले जातात यानुसार ते खाते जाहीर करण्यात आले. समाजकल्याण आणि महिला बालकल्याण हे दोन्ही कक्ष त्या-त्या कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी सजविले होते. पण समाजकल्याण सभापती सौ. शिला निखाते यांनी जुने समाजकल्याण कक्ष सोडून तत्कालीन शिक्षण व आरोग्य सभापती संजय बेळगे यांच्या सभागृहाचा ताबा घेतला. तर माधव मिसाळे यांनी बांधकाम आणि अर्थ या सभागृहाचा ताबा घेतला होता यामुळे सजविलेले समाजकल्याणचे कक्ष नवीन सभापतींच्या प्रतिक्षेत 14 दिवस वाट पाहत बसले. अखेर या कक्षात शिक्षण आणि आरोग्य सभापती माधव मिसाळे यांना बसविण्यात आले. कक्षाहून नाराज असलेले दत्ता रेड्डी मात्र सभापती झाल्यानंतर पहिल्यांदाच जिल्हा परिषदेत आज प्रवेश केला. त्यांना त्यांच्या मनासारखे खाते तर मिळालेच नाही पण सभागृहही मिळाले नाही व गाडी आणि राहण्यासाठीचे शासकीय निवासस्थानही मिळाले. यामुळे त्यांचे समर्थक कमालीचे नाराज झाले आहेत.