वृक्ष लावा- गाव वाचवा सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंचांसह सीईओंना वनमंत्र्यांचे पत्र

0
17

१ मेच्या ग्रामसभेत वृक्ष लागवडीसाठी लोकांना प्रेरित करावे
मुंबई, दि. 25 :   जिथे मोठ्या प्रमाणात झाडांचे अस्तित्त्व असते तिथे पावसाचे प्रमाण अधिक राहते, हे लक्षात घेऊन प्रत्येक ग्रामपंचायतींनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने एक विशेष ग्रामसभा घेऊन दि. १ जुलै ते ७ जुलै दरम्यान गावात लावल्या जाणाऱ्या वृक्षांचे अचूक आणि परिपूर्ण नियोजन करावे, वृक्ष लावा- गाव वाचवा ही संकल्पना घराघरात पोहोचवावी, त्यासाठी विचार आणि संकल्पनांचे आदान-प्रदान करावे,  असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले असून या आशयाचे पत्र त्यांनी राज्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंचांना  पाठवले आहे.
श्री. मुनगंटीवार यांनी सरपंचांना पाठवलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, राज्यात येत्या तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवड होणार असून यामध्ये ग्रामपंचायतींना सन २०१७ मध्ये १ कोटी, २०१८ मध्ये ३ कोटी आणि सन २०१९ मध्ये ८ कोटी अशा एकूण १२ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले आहे.  २०१७ च्या पावसाळ्यात होणाऱ्या वृक्षलागवडीच्या कामाच्या नियोजन आणि यशस्वीतेसाठी  ग्रामपंचायतस्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.  तसेच वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात पार पाडावयाच्या विविध कामांची कालमर्यादा निश्चित करून देताना यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना यापूर्वीच निर्गमित करण्यात आल्या आहेत.
येत्या पावसाळ्यात गाव आणि परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व्हावी,हा कार्यक्रम शासनाचा न राहता जनतेचा व्हावा आणि खऱ्या अर्थाने लोकसहभागातून या कार्यक्रमाची अंमलबजावणी व्हावी यासाठी अधिकाधिक लोकांना या कार्यक्रमात सहभागी करून घेणे, विषयाच्या अनुषंगाने जनजागृती करणे आवश्यक आहे. देशात आणि राज्यात वारंवार येणाऱ्या उष्णतेच्या लाटेची तीव्रता कमी करणे, भविष्यातील पाण्याचे दुर्भिक्ष टाळणे यासाठी देखील मोठ्याप्रमाणात वृक्ष लागवड होणे गरजेचे आहे. वृक्ष लागवडीचे हे शिवधनुष्य पेलण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचेही
श्री. मुनगंटीवार यांनी पत्रात म्हटले आहे.
वृक्ष लागवडीच्या या कामात वन विभागाबरोबर सामाजिक वनीकरण आणि शासनाचे विविध विभाग सहभागी होत आहेत. या कार्यक्रमात समन्वय राहावा म्हणून तालुका आणि जिल्हास्तरावर समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले असून या समन्वय अधिकाऱ्यांची माहिती देणारी पुस्तिका वन विभागाने तयार केली आहे, ती वन विभागाकडून सर्वांना देण्यात येईल. तसेच या समन्वय अधिकाऱ्यांकडून वृक्षारोपण  कार्यक्रमाचे आवश्यक ते मार्गदर्शनही केले जाईल.
जलसंधारण आणि वृक्षारोपण कार्यक्रमाच्या एकत्रित अंमलबजावणीतून गावाचा कायापालट करण्याची संधी आपल्याला उपलब्ध होणार असल्याची बाब वनमंत्र्यांनी या पत्रातून सरपंचांच्या निदर्शनास आणली आहे. “वृक्ष लावा-जीवन वाचवा” ही काळाची गरज ओळखून सर्व ग्रामस्थांना वृक्षलागवडीच्या कामात बरोबर घ्यावे, हे ईश्वरीय कार्य आपल्या नेतृत्वात पुढे जावे व त्यादृष्टीने आवश्यक ते सूक्ष्म नियोजन करावे असे आवाहन वनमंत्र्यांनी सरपंचाना पाठवलेल्या या पत्रात केले आहे.