इतेहाद, जेट एअरवेज बरोबर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पर्यटन विभागाचा सामंजस्य करार

0
13

मुंबई, दि. 25 : महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत इतेहाद आणि जेट एअरवेज या दोन विमान वाहतूक कंपन्यांबरोबर पर्यटन विभागाचा सामंजस्य करार करण्यात आला. देशातील आणि परदेशातील पर्यटकांचा राज्यात ओघ वाढून पर्यटनाला चालना मिळावी आणि विमान कंपन्यांच्या नेटवर्कचा फायदा मिळावा यासाठी हा सामंजस्य करार करण्यात आला.
पर्यटन मंत्री जयकुमार रावल, कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर,जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, या विभागाचे नवनियुक्त प्रधान सचिव नितीन गद्रे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) व्यवस्थापकीय संचालक डॉ. के. एच.गोविंदराज, इतेहाद एअरवेजच्या प्रादेशिक महाव्यवस्थापक नीरजा भाटीया, जेट
एअरवेजचे प्रमुख वाणिज्य अधिकारी जयराज षण्मुगम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, यंदाचे वर्ष हे ‘व्हिजीट महाराष्ट्र २०१७’ म्हणून साजरे केले जात आहे. या पार्श्वभूमीवर इतेहाद,जेट एअरवेज या दोन मान्यवर हवाई वाहतूक कंपन्या आणि पर्यटन विभागामध्ये होत असलेला सामंजस्य करार हा महत्वपूर्ण आहे. या करारामुळे देश-विदेशातील पर्यटकांना महाराष्ट्राची संस्कृती, इथले वेगळेपण, पर्यटनस्थळे पाहता येणे शक्य होणार असून त्यामुळे राज्यातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल.
या सामंजस्य कराराची माहिती देताना पर्यटन मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, या दोन विमान वाहतूक कंपन्यांमधील इनफ्लाईट मॅगझीन, वेबसाईट यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची माहिती देश-विदेशातील पर्यटकांपर्यंत पोहोचविली जाणार आहे. या दोन्ही विमान कंपन्यांकडून होणारे प्रवासी मेळावे, प्रदर्शने आदींमध्येही राज्यातील पर्यटनस्थळे, इथली संस्कृती आदींची माहिती दिली जाणार आहे. इतेहाद कंपनी ही साधारण चार लाख आंतरराष्ट्रीय प्रवाशांबरोबर डिजिटली संपर्कात आहे. या प्रवाशांनाही राज्यातील संस्कृती, पर्यटनस्थळे, पर्यटन विभागाचे विविध उपक्रम आदींची माहिती देण्यात येईल.