नांदेड शहरात आज एचआयव्ही बाधित मुलांचा “हॅप्पी म्युझिक शो”

0
13

नरेश तुप्तेवार, नांदेड दि.29– लातूर जिल्ह्यातील हासेगाव येथील सेवालयामधील हॅप्पी इंडियन व्हिलेज या प्रकल्पातील एच.आय.व्ही.संक्रमीत मुलांचा नांदेड शहरातील उडान फाऊंडेशन यांच्यावतीने रविवारी .३० एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता कुसुम नाट्यगृहामध्ये “हॅप्पी म्युझिक शो” या नृत्याविष्काराचे सादरीकरण होणार असून या सामाजिक उपक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.एचआयव्ही बाधित मुलांसाठी समर्पित प्रा. रवी बापटले यांचे ‘सेवालय’ हे २००६ पासून त्यांच्यासाठी शाळा, त्यांचे पालकत्व, त्यांचे भवितव्य, लोकसहभागातून उभं करत आहेत. १८ वर्षाखालील निराधार मुलांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. सदृढ समाजाने अप्रत्यक्ष नाकारलेल्या या दुर्दैवी मुलांनी स्वतः निधी उभारून स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा निश्चय केला आहे. यासाठी राज्यातील विविध शहरामध्ये “हॅप्पी म्युझिक शो” या नृत्याविष्काराचे स्नेहा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्क्रष्टरित्या सादरीकरण ही मुले करीत आहेत.

नांदेड शहरातील जास्तीत जास्त लोकांनी या सामाजिक उपक्रमास उपस्थित राहून एच.आय.व्ही. बाधित चिमुकल्यांना मदत करावी तसेच कार्यक्रमाच्या प्रवेशिकेसाठी ८४४६२२११८८ आणि ९९७५८९९९८० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उडान फाऊंडेशन, नांदेड यांनी केले आहे.