मध्य रेल्वे सल्लागार समितीवर अनिल पौलकर यांची नियुक्ती

0
10

लातूर,दि.४-लातूर जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल पौलकर यांची मध्य रेल्वेच्या झोनल रेल्वे सल्लागार समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांचे प्रश्न रेल्वेच्या अधिकारी आणि बोर्डाकडे मांडण्यासाठी ही समिती कार्यरत आहे.

देशातील रेल्वे झोनपैकी महत्वपूर्ण असलेल्या मध्य रेल्वेचे मुख्यालय मुंबई हे असून या अंतर्गत मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर आणि भुसावळ हे विभाग येतात. रेल्वे विभाग राष्ट्रीय, झोनल आणि विभाग पातळीवर अशा सल्लागार समित्या स्थापन करीत असते. रेल्वे बोर्डाकडून या समितीच्या सदस्यांच्या नियुक्त्या करण्यात येतात. प्रवाशांच्या अडचणी, त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा याबाबतीचे निर्णय घेणारी ही समिती आहे. रेल्वेच्या परीभाषेतझोनल रेल्वे यूझर्स कन्यूल्येटीव्ह कमिटी असे नाव असलेल्या या समितीवर लातूरचे खासदार सुनील गायकवाड यांच्या शिफारसीवरून पत्रकार अनिल पौलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, अत्यंत कसोटीच्या काळात ही नियुक्ती झाली असून येत्या काळात लातूर जिल्ह्यासह मध्य रेल्वे अंतर्गत येणाऱ्या सर्वच विभागातील प्रवाशांच्या सोयीसुविधा, रेल्वेस्थानकांवरील प्रवाशांना सहन कराव्या लागणाऱ्या अडचणी सोडवण्यावर भर असणार असल्याचे अनिल पौलकर यांनी सांगितले. मुंबई-लातूर ही रेल्वे लातूरपर्यंतच धावेल आणि उदगीरच्या प्रवाशांसाठी बीदर-कुर्ला आणि हैदराबाद-पुणे ही गाडी दैनंदिन स्वरूपात सोडणे असा सन्मानजनक तोडगा निघणार असून त्यावर केवळ शिक्कामोर्तब होणे बाकी असल्याचे पौलकर यांनी सांगितले आहे. माझी नियुक्ती म्हणजे शोभेचे पद नसून ती जबाबदारी असल्याची आपली भावना असून ही निवड म्हणजे पत्रकारीतेचाही सन्मान असल्याचे पौलकर यांनी म्हटले आहे.