समृद्धी मार्गाला शिवसेनेचा विरोधच- उद्धव

0
20
औरंगाबाद,दि.08-शेतकऱ्यांची सोन्यासारखी जमीन काढून त्यांना रस्त्यावर आणणे हा विकास नाही, असे ठणकावत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला कडाडून विरोध केला. पत्रकार परिषदेत शिवसेनेची समृद्धी मार्गाबाबतची भूमिका विशद करण्याआधी त्यांनी समृद्धी मार्गामुळे बाधित होत असलेल्या शेतकऱ्यांची भेट घेत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. ‘तुम्ही ठाम राहणार असाल तर आम्ही तुमच्यासाठी लढू’ अशी ग्वाहीही दिली.
हा महामार्ग विदर्भात जाणारा असून सगळे विकास प्रकल्प विदर्भात जात आहेत, अशा टिप्पणीवर ठाकरे म्हणाले की, विदर्भही माझाच आहे. त्यांचाही विकास व्हायला हवा; पण शेतकऱ्याला मारून वेडावाकडा विकास करू नका असेही ते म्हणाले.
शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानांतर्गत मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांचे अहवाल रविवारी उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात आले. यानंतर एका पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. नितीन गडकरी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाला मुंबई परिसर व नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या विरोधापाठोपाठ औरंगाबाद जिल्ह्यातही विरोध होत आहे. या विषयावर ठाकरे म्हणाले की, कुणाचा सत्यानाश करून होणारा विकास आम्हाला नको आहे. समृद्धी महामार्गात शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जात आहेत. एकीकडे सरकार शेतकऱ्यांना काही मदत करीत नाही. जे शेतकरी आपल्या शेतीतून कमावतात त्यांच्याच सुपीक जमिनी आता घेतल्या जात आहेत. हा महामार्ग थोडा इकडे तिकडे केला तरी या सुपीक जमिनी वाचतील. शेतकऱ्यांकडची सोन्यासारखी जमीन काढून त्यांना रस्त्यावर आणणे हा विकास नाही, असेही त्यांनी ठणकावले.