माओवादावर गृहमंत्र्यासोबत आज दिल्लीत चर्चा

0
9

गोंदिया/गडचिरोली,दि.07-गोंदिया-गडचिरोलीसह देशभरातील ३५ अतिसंवेदनशील माओवादग्रस्त जिल्ह्यांची आज, सोमवारी दिल्लीत बैठक होत आहे. सुकमा आणि गडचिरोली जिल्ह्यात अलीकडेच झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर होणारी ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. विकासाच्या प्रलंबित प्रश्नांसह सुरक्षा दलांकडून माओवादविरोधी प्रयत्नांवर चर्चेचा अजेंडा आहे. त्यामुळे या बैठकीच्या माध्यमातून काय निष्पन्न होणार याकडे लक्ष लागून आहे.

देशात दोनशेहून अधिक जिल्ह्यांमध्ये माओवादाची समस्या आहे. पूर्व विदर्भातील गडचिरोली, गोंदियासह तेलंगणचा काही भाग, छत्तीसगडमधील बस्तर, ओडिशा, झारखंड तसेच बिहारमध्ये माओवादी चळवळ सक्रिय आहे. अतिसंवेदनशील जिल्ह्यांमध्ये गडचिरोली, बस्तर आणि ओडिशातील तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागात माओवाद्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. अलीकडेच सुकमा जिल्ह्यात बुरकापाल येथे माओवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात सीआरपीएफचे २५ जवान शहीद झाले होते. या घटनेची शाई वाळण्यापूर्वीच माओवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात दुसरा हल्ला केला. माओवाद्यांनी केलेल्या भुसुरुंगस्फोटात एक जवान शहीद तर २१ जवान जखमी झाले. या दोन्ही घटनांनंतर देशभरात माओवाद्यांच्या वाढत्या कारवायांवरून चर्चा सुरू झाली. विशेषत: बुरकापाल येथील माओवादी हल्ल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्रालयाने गंभीर दखल घेतली होती. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग आणि गृहमंत्रालयाचे सल्लागार विजयकुमार यांनी बस्तरचा दौरा केला होता.
माओवादग्रस्त भागात विकासकामांवर कोट्यावधी रुपये खर्च होत आहेत. केंद्रीय निमलष्करी दल तैनात आहेत. त्यानंतरही माओवाद्यांच्या कारवाया होत असल्याने या संदर्भात ठोस चर्चा करून मुख्य अजेंडा ठरवण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला आहे. राजनाथसिंग यांनी दिल्लीत यासंदर्भात मुख्य बैठक ठेवली आहे. या बैठकीला माओवादग्रस्त राज्यांचे मुख्यमंत्री, गृहसचिव, मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, पोलिस महानिरीक्षक यांच्यासह ३५ जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पोलिस महासंचालक,गोंदियाचे पोलीस अधिक्षक ,जिल्हाधिकारी, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी नायक, पोलिस अधीक्षक अभिनय देशमुख उपस्थित राहणार आहेत.