गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ

0
15

अकोला,दि.10 : राज्यशासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला. अकोला जिल्ह्यातील कोहळ येथील तळ्यातून गाळ काढून या योजनेस प्रारंभ करण्यात आला.

शासनामार्फत राज्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात जिल्हा परिषदमार्फत ५० गावतलाव व १० पाझर तलाव आणि जलसंधारण (लघुसिंचन) विभागामार्फत १० पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामांचे नियोजन करण्यात आले आहे. जलसंधारण मंत्री राम शिंदे हे या योजनेचा शुभारंभ करण्यासाठी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. येथे आल्यानंतर सकाळीच ते आपल्या ताफ्यासह अकोला तालुक्यातील पातूर नंदापूर, सिसा बोंदरखेड, घुसरवाडी येथे जाऊन त्यांनी जलसंधारण व जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची पाहणी केली. त्यांनंतर दुपारी बार्शीटाकळी तालुक्यातील कोहळ येथे रवाना झाले. कोहळ शिवारातील तलावातील गाळ काढून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार रणधीर सावरकर यांच्यासह भाजप पदाधिकारी व सिंचन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.