मुख्यमंत्र्या़च्या हेलिकाप्टरला बिघाड,नागपूरकडे कारने रवाना

0
11

अहेरी,दि१२ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अहेरी उपविभागातील तीन महत्वाचे कार्यक्रम आटोपल्यानंतर अचानक हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने त्यांना कारने लांबलचक प्रवास करुन नागपूर गाठावे लागल्याची माहिती आहे.बैठकीनंतर मुख्यमंत्री कारने अहेरी येथील प्राणहिता पोलिस उपमुख्यालयात पोहचले. तेथील हेलिकॉप्टर सुरु झाले, मात्र, उड्डाण घेण्यास असमर्थ होते. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांना कारने नागपूरकडे प्रस्थान करावे लागले.

नियोजित कार्यक्रमानुसार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चामोर्शी तालुक्यातील आष्टीनजीकच्या कोनसरी येथील लॉयड मेटल्सच्या लोहप्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण,  बामणपेठ येथील माजी मालगुजारी तलावाच्या खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ व आलापल्ली येथे अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यासाठी आले होते. सकाळी ११ वाजता मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर कोनसरी येथे उतरले. साडेअकरा वाजता लोहप्रकल्पाचा कार्यक्रम सुरु झाला आणि साडेबारा वाजता तो संपला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरने बामनपेठला जाण्यासाठी उड्डाण घेतले. तेथेही नियोजित वेळी पोहचून मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना संबोधित केले. त्यानंतर ते अहेरी येथील प्राणहिता पोलिस उपमुख्यालयात आले. तेथे त्यांनी पोलिस विभागाच्या कामगिरीचा आढावा घेतला.

पुढे २ वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री फडणवीस हे पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या गाडीने आलापल्ली येथील वनविभागाच्या कार्यालयात पोहचले. तेथे त्यांनी मध, मोहफुलांपासून बनविलेले पदार्थ आणि बांबू व लाकडांपासून बनविलेल्या विविध वस्तूंची पाहणी केली. शिवाय लाकूड वाहतूक करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या हत्तीलाही घास भरविला. त्यानंतर वनसंपदा सभागृहात मुख्यमंत्र्यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी श्री.फडणवीस यांनी आपले शासन नागरिकांच्या सेवेसाठी असल्याची जाणीव अधिकाऱ्यांना करुन दिली. ‘बाप दाखव, नाही तर श्राद्ध कर’, अशी आपली भूमिका असल्याचे सांगून श्री.फडणवीस यांनी कामचुकार अधिकाऱ्यांना सोडणार नाही, अशा शब्दात खडसावले.