लॉयड् मेटल्स प्रकल्पात केवळ स्थानिक तरुणांनाच नोकरी :मुख्यमंत्री

0
12
  • गडचिरोली जिल्हयातील पहिल्या लोहप्रकल्पाचा शुभारंभ
    गडचिरोली,दि १२ मे : तरुणांना हातात बंदुका नकोत . त्यांना विकास हवा असतो . त्यामुळे उद्योग आला की विकास येतो. संपन्नता येते. माझ्या सरकारने गडचिरोलीचा विकास करण्याचे आश्वासन दिले होते .लॉयड् स्टील उद्योगाच्या शुभारंभाने ते पूर्ण होत असून कोणत्याही परिस्थितीत केवळ गडचिरोली जिल्ह्यातील तरुणांनाच या ठिकाणी रोजगार मिळेल , असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले
    गडचिरोली जिल्हयातील चार्मोशी तालुक्यातील कोनसरी येथे लॉयड्स मेटल्स अॅन्ड एनर्जी लिमिटेडच्या लोह प्रकल्पाचा शुभारंभ आज त्यांच्या हस्ते झाला . ८०० कोटी रुपयांच्या या उद्योगातून किमान १ हजार स्थानिक युवकांना या ठिकाणी रोजगार मिळणार आहे . जिल्हयातील सूरजगड येथील खाणीतून निघणाऱ्या लोहखनीजावर या ठिकाणी प्रक्रीया करण्यात येणार आहे . या प्रकल्पासाठी जमीनी देणाऱ्या शेतकऱ्यांनी स्वयंप्रेरणेने पुढे येत जिल्हयाला विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी जमीनी दिल्या . मुख्यमंत्र्यांच्याहस्ते धनादेश देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सिंचन विहिरीच्या धनादेशाचेही प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांना वाटप झाले .या लोह प्रकल्पाच्या शुभारंभ कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गडचिरोलीचे पालकमंत्री ना. राजे अंबरीश राव आत्राम, जि .प. अध्यक्ष योगीताताई भांडेकर , खासदार अशोक नेते , आमदार मितेश भांगडीया,आमदार देवराव होळी , आमदार क्रिष्णा गजबे , लॉयड मेटल्सचे संचालक अतुल खाडीलकर , मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी , जिल्हाधिकारी एस.आर. नायर आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती .
    या प्रकल्पाच्या फलकाचे अनावरण केल्यानंतर या परिसरातील शेतकरी व गावकऱ्यांशी त्यांनी जाहीर सभेतून संवाद साधला. ते म्हणाले ,लॉयड उद्योगाला जिल्हयात उत्खननाची परवानगी देतानाच या परिसरातच उद्योग उभारावा अशी अट टाकली होती .आज त्यांनी आमच्या अटीनुसार हा प्रकल्प या ठिकाणी सुरू केला आहे . मात्र आज पुन्हा आपल्या सर्वांच्या साक्षीने या उद्योग समूहाला माझे सांगणे आहे की , गरज असेल तरच गडचिरोली जिल्ह्याच्या बाहेरचा एखादा दुसरा कर्मचारी घ्या . अन्यथा या उद्योगात गडचिरोलीचीच मुले घेतली गेली पाहीजे. शेतकऱ्यांनी त्यांच्या या घोषणेचे स्वागत केले . तर या उद्योग समूहाचे संचालक अतुल खाडीलकर यांनी आलापल्ली आयटीआय दत्तक घेत असल्याची यावेळी घोषणा केली . मुख्यमंत्र्यांनी पुढील तीन वर्षात हा उद्योग उभा राहत असतानाच आयटीआयमध्ये या उद्योगाला पूरक असणाऱ्या अभ्यासक्रमालाही सुरू करण्याचे आदेश दिले .
    देश स्वतंत्र झाल्यापासून खनिज संपत्तीने परिपूर्ण असणारा गडचिरोली जिल्हा केवळ काही लोकांच्या विरोधामुळे औद्योगिकीकरणापासून दूर राहीला . आमचे सरकार आल्यापासून सतत गडचिरोलीच्या विकासाचा ध्यास आम्ही घेतला आहे . शेतकऱ्यांना एकीकडे सिंचन विहिरी , विद्युत पंप , वीज पुरवठा उपलब्ध करुन देणे सुरु असून दुसरीकडे गडचिरोली -चंद्रपूर जिल्हयात बांबूवर आधारीत विकास प्रकल्प आम्ही उभारले आहे . जंगलातील मोहफूल व अन्य संपदांवर प्रक्रीया उद्योग सुरु होणार आहे . यावरील वाहतूक निर्बंध काढून टाकले आहेत . आमची स्पष्ट नीती आहे . येथील वनसंपदेचा येथील स्थानिकांना रोजगारासाठी उपयोग झाला पाहीजे .
    गडचिरोली जिल्हयाची वनसंपदा,खनीजसंपदा विपुल आहे. मात्र यावर सुरू होणारे उद्योग आणि त्यासाठी येणाऱ्या लोकांच्या वसाहती यापुढे निर्माण होऊ देणार नाही . वनसंपदा येथील वापरायची असेल तर रोजगारही आता स्थानिकांनाच मिळेल, याचा त्यांनी पुनरुच्चार केला .
    वडसा देसाईगंज ते गडचिरोली हा रेल्वे मार्ग वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार स्वतः जमीन अधिग्रहण व अन्य बाबींसाठी पुढाकार घेत आहे . या प्रकल्पाला गती देण्यासाठी मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या वार रूममधील प्रकल्पात पाठपुराव्यासाठी या लोहमार्गाचा समावेश करण्यात आला आहे . यावेळी हा प्रकल्प आता गडचिरोली पर्यंतच मर्यादीत राहणार नसून हैदराबादला जोडला जाणार असल्याची खुषखबरही त्यांनी उपस्थितांना दिली .लॉयड मेटल्स प्रकल्पासाठी पुढे येऊन जमीनी देणाऱ्या शेतकऱ्यांचे व या प्रकल्पाचा सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचे यावेळी त्यांनी जाहीर कौतुक केले