जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त मंगळवारला राष्ट्रीय कृषी पर्यटन परिषदचे आयोजन

0
12

मुंबई, दि. 12 : युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरीझम ऑर्गनायझेशन (UNWTO) यांनी जाहीर केलेल्या शाश्वत पर्यटन विकास वर्ष 2017 तसेच व्हिजीट महाराष्ट्र वर्ष 2017 आणि 10 व्या जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त राष्ट्रीय कृषी पर्यटन परिषदचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते मंगळवार दि.16 मे रोजी सकाळी 9 वाजता मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृह येथे होईल. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर असतील.
कृषी पर्यटनाच्या माध्यमातून राष्ट्र विकासाला आणि ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबाच्या विकासाला चालना मिळावी यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 ते सांयकाळी 5 या दम्यान विविध कार्यक्रम होणार असून त्यामध्ये राष्ट्रीय कृषी पर्यटन परिषदचे उद्‌घाटन, कृषी पर्यटन गौरव पुरस्काराचे वितरण तसेच या कार्यक्रमात विविध राज्यातून येणारे कृषी तसेच पर्यटन क्षेत्रातील विशेषतज्ज्ञ मार्गदर्शन करणार असल्याची माहिती जागतिक कृषी पर्यटक दिन कार्यक्रमाचे समन्वयक श्री. पांडुरंग तावरे यांनी दिली.
परिषदेस पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, कामगार मंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर, पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, कृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे आदी उपस्थित राहणार आहेत.