राज्याचे कृषी पर्यटन धोरण लवकरच- जयकुमार रावल

0
17

मुंबई, दि. 16 – कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी त्याला जोडव्यवसायाची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात कृषी पर्यटनाला मोठा वाव असून, त्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने स्वतंत्र कृषी पर्यटन धोरण तयार केले आहे. हे धोरण लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

दहाव्या जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कृषी पर्यटन परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय (पदूम) मंत्री महादेव जानकर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, अ‍ॅग्री टुरीजमचे व्यवस्थापकीय संचालक पांडुरंग तावरे, गोवर्धन इको व्हीलेजचे निरज कपूर, कृषी पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेले भगवान तावरे, माधव सानप, अभिजित फाळके आदी मान्यवर उपस्थित होते. एमटीडीसी आणि अ‍ॅग्री टुरीजम यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मंत्री रावल म्हणाले की, आपले राज्य हे कृषीप्रधान राज्य आहे. याशिवाय राज्याला वेगळी अशी ऐतिहासीक, सांस्कृतिक ओळख आहे. राज्यात शहरीकरण हे साधारण ५० टक्क्यांपर्यत वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामीण जीवनशैली, कृषी संस्कृती यांचे आकर्षण वाढले आहे. या संधीचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी कृषी पर्यटन व्यवसायावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. राज्य शासनानेही कृषी पर्यटनाला चालना देण्याचे ठरविले असून त्यादृष्टीने समग्र असे कृषी पर्यटन धोरण तयार करण्यात आले आहे. येत्या २३ मे रोजी यासंदर्भात वित्त आणि उर्जा मंत्र्यांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली आहे. धोरणाचा मसुदा तयार झाला असून त्यास मान्यता घेऊन लवकरच हे धोरण जाहीर करण्यात येईल.  कृषी पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने अनेक तरतुदी या धोरणात असतील, असे त्यांनी सांगितले.