सायबर हल्याच्या धोक्याबाबत खासदार नाना पटोले यांनी दिला होता इशारा

0
9

नवी दिल्ली, १६ : सध्या जगभरात गाजत असलेल्या रॅन्समवेअर या सायबर हल्याबाबत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाचे खासदार नाना पटोले यांनी दूरदृष्टी ठेवून  वर्षभरापुर्वीच संसदेत प्रश्न उपस्थित केला होता.
लोकसभेत नियम ३७७ अंतर्गत दिनांक ११ में २०१६ रोजी श्री. पटोले यांनी सायबर हल्याबाबत मुद्दा उपस्थित केला. यात त्यांनी म्हटले होते, प्रसार माध्यमांद्वारे पुढे आलेल्या माहितीनुसार आयआरसिटीसी या भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरील डाटा हॅक करण्यात आला. यामध्ये जवळपास १ कोटी ग्राहकांचा डाटा हॅक करण्याची भिती त्यांनी वर्तविली होती. या
संकेतस्थळाद्वारे कोटयावधी रूपयांची देवाण-घेवाण करण्यात येते. ऑनलाईन रेल्वे तिकीट काढण्यासाठी आधारकार्ड, क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड आणि नेटबँकींगची माहिती ग्राहकांकडून पुरविण्यात येते. वेबसाईट हॅक झाल्यास ग्राहकांची महत्वपूर्ण माहिती चोरल्या जावू शकते. याचा विविध महत्वपूर्ण सेवांवर परिणाम होऊ शकतो असा प्रश्न उपस्थित श्री. पटोले यांनी उपस्थित
केला होता.
पटोले यांनी १८ नोव्हेंबर २०१६ रोजी लोकसभेत अतारांकीत प्रश्नाद्वारे भारतीय बॅकींग क्षेत्रावरील सायबर हल्याशी निगडीत प्रश्न उपस्थित केला होता. यात त्यांनी म्हटले होते, भारतीय रिझर्व्ह बँकेने
कोणत्याही मोठया सायबर हल्याशी सामना करण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने कोणत्या उपाय योजना आहेत असा प्रश्न विचाला होता. यावर लिखीत  उत्तरात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी सांगितले, देशात कोणत्याही मोठया सायबर हल्याचा सामना करण्यासाठी ‘सायबर संकट व्यवस्थापन दला’ ची स्थापना करण्यात आली आहे. तसेच, बँकींग परिवेक्षणासाठी सीईआरटीआयएन च्या मदतीने शासन बँकेमधील सुरक्षेबाबत पडताळणी करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे  खा. पटोले यांनी दिनांक १२ एप्रिल २०१७ रोजी लोकसभेत तारांकित प्रश्नाद्वारे मुद्दा उपस्थित करून भारतातील अणु ऊर्जा संस्थांवर आतंकवादी किंवा सायबर हल्ला झाल्यास याचा सामना करण्यासाठी देशाच्या सज्जतेबाबत प्रधानमंत्री यांना संबोधून प्रश्न विचारला होता. देशातील अणु ऊर्जा संस्थांमध्ये उत्तम दर्जाची आंतरीक व बाहय सुरक्षा स्थापीत करण्यात आल्याचे तसेच, सायबर हल्याला परतवून लावण्यासाठी उच्च दर्जाचे तंत्रज्ञान वापरण्यात येत असल्याचे उत्तर प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिले होते.