जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

0
15

सांगली, दि. 19 : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आज करण्यात आले. यावेळी सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषि व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजयकाका पाटील, महापौर हारूणभाई शिकलगार, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आमदार सर्वश्री डॉ. पतंगराव कदम, मोहनशेठ कदम, अनिल बाबर,  डॉ. सुरेश (भाऊ) खाडे, शिवाजीराव नाईक, सुधीर (दादा) गाडगीळ, विलासराव जगताप, पुणे
विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग पुण्याचे मुख्य अभियंता पी. एम. किडे, उपमुख्य वास्तुशास्त्रज्ञ एस. डब्ल्यू. गेडाम, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, सार्वजनिक बांधकाम मंडळ कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता एस. एस. साळुंखे, मिरज सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एस. जाधव तसेच विविध विभागांचे अधिकारी,
पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच सांगली ब्रँडींगच्या चित्रफितीचे (सी. डी.) प्रकाशन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सांगली ब्रँडींग दिनदर्शिका भेट दिली.
सांगली, मिरज आणि कुपवाडला मध्यवर्ती असणाऱ्या विजयनगर येथील नवीन प्रशासकीय इमारतीजवळ नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाची देखणी, प्रशस्त आणि भव्य इमारत आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी 25 कोटी, 4 लाख, 70 हजार रूपयांची प्रशासकीय मान्यता आहे. ही इमारत तळ अधिक 2 मजले असून एकूण बांधकाम क्षेत्रफळ 6 हजार 300 चौ.मी. इतके आहे. या इमारतीची तीन
मजल्यांची आर.सी.सी. कामे, वीट बांधकाम, गिलावा, डोमचे काम, फरशी काम, बाह्य व अंतर्गत गिलावा, बाहेरील ऍ़ग्रोगेड प्लॅस्टर, गोकाक स्टोन क्लॉडिंग, खिडक्याचे ग्रील व दारे, जीने व रेलींग इत्यादी कामे पूर्ण झाली आहेत. फर्निचरचे काम अंतिम टप्प्यात आहे.
या इमारतीत तळमजला येथे वाहन तळाचे क्षेत्रफळ 686.75 चौ.मी. इतके आहे.तसेच उपहारगृह, झेरॉक्स कक्ष, एनआयसी कार्यालय, अभिलेख कक्ष, टपाल शाखा,मीटर रूम, स्त्री/पुरूष स्वच्छतागृहे, चालक विश्रांती कक्ष या सुविधा 1462.33 चौ. मी. इतक्या क्षेत्रफळामध्ये आहेत. पहिल्या मजल्याचे क्षेत्रफळ 2149.08 चौ.मी. असून यामध्ये जिल्हाधिकारी यांचे कार्यालयीन कक्ष, निजी कक्ष, बैठक कक्ष, स्वीय सहाय्यक कक्ष, प्रतिक्षा कक्ष, अप्पर जिल्हाधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार, कर्मचारी कक्ष, पुनर्वसन,उपजिल्हाधिकारी भूसंपादन 6 कक्ष, लेखा शाखा, नियोजन शाखा, सभागृह, करमणूक कर शाखा, उपचिटणीस शाखा, निवासी उपजिल्हाधिकारी कक्ष व आवश्यकतेप्रमाणे स्त्री/पुरूष स्वच्छतागृहे इत्यादी सुविधांचा समावेश करण्यात आला आहे.
दुसऱ्या मजल्याचे क्षेत्रफळ 2149.08 चौ.मी. इतके असून यामध्ये महसूल शाखा, उपजिल्हाधिकारी महसूल, उपजिल्हाधिकारी नागरी जमीन कमाल धारणा,बिनशेती, कर्मचारी वर्ग कक्ष, विशेष कार्यकारी शाखा, उपजिल्हाधिकारी निवडणूक, आस्थापना, समन्वय शाखा, व्हीआयपी प्रतिक्षालय, मिटींग हॉल 2 कक्ष, उपजिल्हाधिकारी भूसंपादन 3 कक्ष, उपचिटणीस शाखा, नैसर्गीक आपत्ती
व्यवस्थापन शाखा, तलाठी, उपजिल्हाधिकारी पुरवठा शाखा, उपजिल्हाधिकारी भूसंपादन समन्वय, उपजिल्हाधिकारी रोहयो व आवश्यकतेप्रमाणे स्त्री/पुरूष स्वच्छतागृहे इत्यादी सुविधांचा समावेश करण्यात आला आहे.या इमारतीस संरक्षक भिंत, अंतर्गत रस्ते, आर.सी.सी. गटर, भूसुधारणा,अग्नि प्रतिबंधक उपाय योजना, विद्युतीकरण, फर्निचर व रेन वॉटर हॉर्वेस्टिंग, बाह्य पाणी पुरवठा व उद्वाहक (लिप्ट) इत्यादी अन्य सुविधांचा समावेश करण्यात आला आहे.