एस. जलजांची एकोडी प्राथमिक आरोग्य केंद्र व रोहयोच्या कामाला भेट

0
20

गोंदिया,दि.१९ : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या निमंत्रित सदस्य श्रीमती एस.जलजा हया १८ मे रोजी जिल्हयाच्या दौऱ्यावर आल्या असता त्यांनी गोंदिया तालुक्यातील एकोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देवून पाहणी केली. यावेळी उपस्थित आरोग्य अधिकारी, कर्मचारी, नागरिक व रुग्णांशी संवाद साधला.
प्राथमिक आरेग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांची किती पदे आहेत व रिक्त पदांची माहिती जाणून घेतली. वैद्यकीय अधिकारी डॉ. सिरसाठ यांनी माहिती देतांना सांगितले की, पुरुष व स्त्री रुग्णांसाठी स्वंतत्र वार्ड आहे. आंतररुग्ण सुविधा आहे. मलेरीया, क्षयरोग व बाळंतपणासाठी रुग्ण येथे येतात. रुग्णालयाला नवीन रुग्णवाहिकेची आवश्यकता असून पाण्याची सुविधा नसल्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह रुग्ण व नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपलब्ध राहत नाही. पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. वार्डाची व स्वच्छतागृहाची नियमित स्वच्छता केली जात नसल्याची माहिती नागरिकांनी श्रीमती जलजा यांना दिली.
श्रीमती जलजा यांनी रुग्णालयातील महिला व पुरुष वार्ड, शस्त्रक्रीया कक्ष, औषधसाठा कक्ष, निर्जतुकीकरण कक्ष, प्रयोगशाळा कक्ष, आरोग्य सहायिका कक्ष व स्वच्छता गृहाची पाहणी केली. आरोग्य सेविकानी नियमित आंगणवाडीत भेट देवून बालकांचा वाढदर्शक तक्ता नियमित पाहावा व त्यानूसार त्यांना आहार देण्याचे सांगून नियमित उपचार करावे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीच्या निधीतून आवश्यक ते वैद्यकीय साहित्य खरेदी करावे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, नवीन रुग्णवाहीका तसेच अधिकारी कर्मचारी शासकीय निवासस्थान यांची दुरुस्ती करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्राथमिक आरोग्य केंदा्रची इमारतीची देखभाल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या घराप्रमाणे करावी. बाळंतपणासाठी येणाऱ्या महिलांना चांगल्या सुविधा उपलब्ध करुन दयाव्यात. त्याचप्रमाणे उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची काळजी घ्यावी. असे त्यांनी यावेळी सांगितले.
रोहयो कामाची पाहणी व मजूरांशी संवाद
श्रीमती एस.जलजा यांनी गोंदिया तालुक्यातील धामनेवाडा ग्रामपंचायत अंतर्गत्‍ सुरु असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या नाला सबलीकरणाच्या कामाला भेट देवून पाहणी केली व उपस्थित असलेल्या मजूरांशी संवाद साधला. नाला खोलीकरणाचे काम ५०० मीटरचे असून यावर २७२ मजूर काम करीत असल्याची माहिती ग्रामसेवक पी.एस.बिसेन यांनी दिली.
मजूरांशी संवाद साधताना श्रीमती जलजा यांनी आपण या कामावर सकाळी किती ते कितीवाजता पर्यंत काम करता याची विचारणा केली. यावेळी उपस्थित महिलांनी सकाळी ९ ते सांयकाळी ५ या वेळात काम करीत असल्याचे सांगितले. यावर श्रीमती जलजा म्हणाल्या, ही कामाची वेळ बदलून पहाटे ६ वाजता सकाळी ११ आणि दुपारी ४ ते ६ यावेळेत काम करावे. म्हणजे उन्हा पासून बचाव करता येईल. आपल्याला प्रतिदिन किती रुपये मजूरी मिळते याची माहिती त्यांनी जाणून घेतली. जवळपास १५० रुपये ते १७५ रुपये प्रतिदिन मजूरी पडत असल्याचे महिलांनी सांगितले. हा पैसा आमच्या खात्यात थैट जमा होतो परंतु मागील दोन हप्त्यापासून कामाचा पैसा जमा झाला नसल्याचे कामावरील मजूर गुजूबा भोयर व सदाराम बावनकर यांनी सांगितले.
मजूरीतील मिळणाऱ्या पैशाचा योग्य विनियोग करावा व आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी या पैशाचा उपयोग करावा व व्यसनापासून दूर राहावे असे श्रीमती जलजा यांनी यावेळी सांगितले. रोजगारसेवक गिरीधारी तिडके यांचेकडूनही रोहयोच्या कामाची माहिती जाणून घेतली.