काही जणांकडेच ‘सामाजिक न्याय’चा निधी : चंद्रकांतदादा पाटील

0
18

कोल्हापूर, दि. 24 – ‘सामाजिक न्याय’विभागाला घटनेच्या आधारे मोठा निधी मिळतो. तो सर्वसामान्यांपर्यंत जावा अशी अपेक्षा आहे. मात्र तो काहीजणांकडेच फिरतोय. म्हणूनच ज्यांनी योजनांचा याआधी लाभ घेतला आहे त्यांनी इतरांना लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजउत्थान पुरस्कारांचे वितरण बुधवारी येथील केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. राज्यातील सहा संस्थांना आणि १२५ जणांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

मंत्री पाटील म्हणाले, समाजातील स्थिती पाहता आम्ही जेव्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करत होतो तेव्हा आमच्या हयातीत परिवर्तन होईल असे वाटत नव्हते. मात्र आता चांगली नोकरी, लठ्ठ पगार सोडून अनेकजण इतरांच्या विकासासाठी काम करताना दिसत आहे. अनेक व्यक्ति आणि संस्था त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पुढे येत आहेत. त्यामुळे आशावादी चित्र निर्माण झाले आहे.सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले म्हणाले, जातीव्यवस्था नष्ट व्हावी यासाठी शाहू, फुले, आंबडेकर यांनी प्रयत्न केले. हाच विकासाच्या विचाराचा धागा पकडून सामाजिक न्याय विभागाच्यावतीने काम सुरू आहे. आंबेडकरांनी वास्तव्य केलेले लंडनमधील घर असो, इंदू मिलचे स्मारक असो ही कामे मार्गी लावली असतानाच आंबेडकरांचे जेथे जेथे वास्तव्य होते ती ठिकाणे विकसित करण्याचे धोरण आमच्या विभागाने आखले आहे.

सामाजिक न्याय खात्याचे राजयमंत्री दिलीप कांबळे म्हणाले, गेल्या दोन अडीच वर्षामध्ये राजयातील दीन, दलित, शोषित, पीडीत समाजाला न्याय देण्याचे काम आमच्या विभागातर्फे सुरू आहे. पूर्वी कमी संख्येने विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जावेत म्हणून त््यांना शिष्यवृत्ती दिली जात होती. मात्र आम्ही किमान १२५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या वर्षी ७५ मुले मुली शिक्षणासाठी परदेशात गेली. आजच्या पुरस्कार विजेत्यांनी समाज आणि शासन यांच्यामधील दुवा व्हावे.

या विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. तर समाजकल्याण आयुक्तक पियूष सिंह यांनी आभार मानले. कार्यक्रमाला महापौर हसीना फरास, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार सुजित मिणचेकर, माजी राजयमंत्री भरमूआण्णा पाटील, उत्तम कांबळे, सामाजिक न्याय विभागाचे अतिरिक्त आयुक्तक सदानंद पाटील, प्रादेशिक उपायुक्त रविंद्र कदम पाटील, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत, विशेष अधिकारी विशाल लोंढे, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी प्रदीप भोगले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.