अरुणभाईंचे व्यक्तिमत्व म्हणजे कर्तृत्व आणि नम्रतेचा अनोखा संगम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
17

जळगाव, दि.29- अरुणभाईंचे व्यक्तिमत्व म्हणजे कर्तृत्व आणि नम्रतेचा अनोखा संगम आहे. केवळ वक्तृत्वच नव्हे तर आचरणही श्रेष्ठ असणारे ते एक दुर्मिळ व्यक्तिमत्व आहेत,अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांचा गुणगौरव केला.
राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या अमृत महोत्सवानिमित्त चोपडा येथील प्रताप विद्या मंदिरात कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते श्री. गुजराथी यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.या सोहळ्यास प्रमुख अतिथि म्हणून मुख्यमंत्री संबोधित करीत होते.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम (सा.ऊ.वगळून) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. गिरीष महाजन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले, सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उज्ज्वलाताई पाटील, रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे, माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे, राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, आ. अमरिशभाई पटेल, आ. चंद्रकांत सोनवणे, आ. संजय सावकारे, आ. सुरेश भोळे, आ.स्मिताताई वाघ, आ.हरीभाऊ जावळे, आ. चंदुभाई पटेल, आ. डॉ. सतिष पाटील, चोपड्याच्या नगराध्यक्ष मनिषा चौधरी, कवी ना. धो. महानोर, माजी खा. ईश्वरबाबू जैन, माजी खा. डॉ. गुणवंतराव सरोदे, चोपडा पिपल्स बॅंकेचे अध्यक्ष चंद्रहास गुजराथी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रत्येक ठिकाणी आदर्श निर्माण केला- माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
पुण्याला शिकत असतांना मी आणि अरुणभाई एका वर्गात होतो. गांधीवादी संस्कारात वाढलेल्या अरुण भाईंनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात ही चोपड्याच्या नगराध्यक्षपदापासून केली. आणि नगराध्यक्षाची आदर्श कारकिर्द कशी असावी याचा आदर्श त्यांनी लोकांसमोर ठेवला. असा आदर्श त्यांनी ज्या ज्या पदावर काम केले तेथे निर्माण केला. राष्ट्रकुल संसदीय मंडळात लंडन येथे भारताची भूमिका त्यांनी प्रखरपणे मांडली. त्यांच्या अभ्यासूवृत्तीने आणि नम्र स्वभावाने त्यांनी अनेक ठिकाणी आपले कर्तृत्व सिद्ध केले.
यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, विशेष पोलिस महानिरीक्षक विनय चौबे, पोलीस अधिक्षक दत्तात्रय काराळे, पोलीस उपअधिक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय अधिकारी संजय गायकवाड, तहसिलदार दीपक गिरासे आदी तसेच चोपडा परिसरातील नागरिक, लोकप्रतिनिधी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. अरुणभाई गुजराथी गौरव समितीचे आ. डॉ. सतिष पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.