जलयुक्त शिवार योजना देशभर राबविणे गरजेचे -केंद्रीय ग्रामविकास मंत्री तोमर

0
22

मुंबई, दि. 31 : राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या संकल्पनेतील जलयुक्त शिवार अभियान आणि सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजना पूर्ण देशात राबविणे गरजेचे असल्याचे केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे ग्रामविकास विभागाच्या नागपूर आणि अमरावती विभागाच्या आयोजित विविध योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, केंद्रीय ग्रामविकास विभागाचे सहसचिव प्रशांतकुमार, अपर सचिव नागेंद्र सिंह, राज्याचे ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे सचिव विवेक नाईक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांची उपस्थिती होती.मंत्री तोमर म्हणाले की, राज्यातील जलयुक्त शिवार अभियानाच्या यशामुळे जमिनीत पाणीसाठा वाढला, परिणामी सिंचन क्षेत्र वाढून शेतकऱ्यांना सुखी करण्याचे काम केले आहे. यामुळे ही योजना देशातील काही
राज्यांनी सुरू केली असून पूर्ण देशात जलयुक्त शिवार अभियानाची अंमलबजावणी करण्याचे विचार सुरू असल्याचे सांगितले. तसेच राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या केंद्र शासनाकडून व्याज अनुदान प्राप्त महिला स्वयंसहाय्यता समुहांना प्रभावी शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून महिलांना सक्षम करण्याचे काम सुरू असल्याने ही योजना सर्वदूर पोहचणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री तोमर म्हणाले की, केंद्र शासनाच्या अनेक योजनांची अंमलबजावणी राज्याकडून होत असते. यामध्ये पंतप्रधान ग्राम सडक योजना, आवास योजना अशा योजनांना उद्दिष्ट आणि कालावधी दिलेला असतो. हे उद्दिष्ट कालमर्यादेत करणे केंद्र शासनाला अपेक्षित असते. महाराष्ट्र राज्यांनी या योजनांची उद्दिष्ट कालमर्यादेत पूर्ण केल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.
राज्यात अस्मिता योजना राबविण्यात येणार असून या योजनेअंतर्गत महिला बचत गटांद्वारे सॅनेटरी नॅपकीन सवलतीच्या दरात देणार आहेत. तसेच शाळेतील मुलींना पाच रूपयात सॅनेटरी नॅपकीन देण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक गावात एका महिला बचत गटाची निवड करण्यात येणार आहे. बचत गटांना व्यवसायास वाव मिळणार आहे. या योजनेत शासनाची गुंतवणूक राहणार नसल्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. प्रधानमंत्री आवास योजना, ग्राम विद्युत व्यवस्थापक, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, आपले सरकार सेवा केंद्र, स्मार्ट ग्राम योजना, चौदावा वित्त आयोग, आमचं गाव आमचा विकास आदि योजनांचा सविस्तर आढावा श्रीमती मुंडे यांनी यावेळी घेतला.