महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती शेतकऱ्यांना मिळणार- मुख्यमंत्री

0
6

बीड, दि. 3 : राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहेात. शेतकऱ्यांचे काही प्रश्न घेऊन शेतकरी संपावर गेले, त्यांच्याशी काल रात्री उशिरापर्यंत चर्चा करुन महत्वाचे अनेक निर्णय घेतले. शेतकऱ्यांच्या पाठिशी कायम ठामपणे उभे राहण्याची  आमची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे गोपीनाथ गडावर केले.
पांगरी कॅम्प येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील गोपीनाथ गडावर दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या तिसऱ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे, राज्याचे स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास,मत्सव्यवसाय मंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, खासदार डॉ. सुनील गायकवाड, खा. प्रीतमताई मुंडे, आमदार सर्वश्री लक्ष्मण पवार, विनायक मेटे, सुजित ठाकूर, अतुल सावे, सुधाकर भालेराव, आर.टी. देशमुख, मोहन फड,भीमराव धोंडे, श्रीमती संगिता ठोंबरे आदी उपस्थित होते.
राज्यातील गरीब, अल्पभूधारक शेतकऱ्यांना या कर्जमुक्तीचा फायदा होणार आहे. मराठवाडा, विदर्भ, खान्देश, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील 80 टक्के शेतकऱ्यांना या कर्जमुक्तीचा लाभ होईल. ज्याचे थकीत कर्ज आहे त्यांना त्यातून बाहेर काढण्यात येईल,असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आमचे मार्गदर्शक दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांनी राज्यातील दीन दुबळ्यांसाठी, गरीबांसाठी, मागासवर्गासाठी, ओबीसींसाठी, अल्पभूधारकांसाठी सातत्याने संघर्ष केला, त्यांना न्याय मिळवून देण्याचे प्रयत्ने केले, त्यांचाच आदर्श घेऊन आमचे सरकार काम करीत आहे. त्यामुळे गेल्या सरकारने केलेल्या कर्जमाफीपेक्षा दुपटीने अधिकची कर्जमुक्ती आम्ही देणारा आहोत,असेही त्यांनी स्पष्ट केले.
फडणवीस म्हणाले की, काहींना शेतकऱ्यांचा संप मिटू नये, असे वाटत होते. आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतल्याने त्यांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. त्यामुळे ते शेतकऱ्यांचा बुध्दीभेद करण्याचा प्रयत्न करतील,त्यांच्या बुध्दीभेदाला बळी पडू नका, कारण आम्ही राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील एकही शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित राहणार नाही यासाठी याबाबतचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत केली आहे. त्यामुळे एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.
गोपीनाथराव मुंडे हे जिगरबाज, हिम्मतवान, संघर्षशील नेते होते. सामान्यांच्या प्रश्नासाठी संघर्षाची भूमिका घेऊन ते प्रश्न सोडवणारे नेते होते. तळागाळातील जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्यांनी जीवनभर  संघर्ष केला. त्यामुळेच आम्ही आज या पदावर पोहचू शकलो. त्यांच्या स्वप्नातील समाज साकार करण्यासाठी आम्ही कटीबध्द आहेात असे सांगूण मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतांना रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी परळी-बीड- अहमदनगर रेल्वेचा जो प्रस्ताव आम्ही दिला तो स्वीकारला त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची उपलब्धता करुन दिली. त्यात राज्य सराकारनेही आपला वाटा दिला. त्यामुळे परळी-बीड-अहमदनगर रेल्वेचे गोपीनाथराव मुंडे यांचे  स्वप्न लवकरच साकार होईल. 2019 मध्ये आम्ही रेल्वेने येऊन या मार्गाचे उद्घाटन करु असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.
गोपीनाथराव मुंडे लोकविलक्षण, सर्वसामान्य माणसांवर प्रेम करणारे महान नेते होते. त्यांच्या निघून जाण्याने लाखोंच्या जीवनात दु:ख निर्माण झाले, असे सांगूण सुरेश प्रभू म्हणाले की, त्यांनी प्रेम, प्रोत्साहन मला दिले. मार्गदर्शन केले, त्यांची नेहमी आठवण होते. पुढील काळात परळी-बीड-अहमदनगर रेल्वे सुरू झाल्यानंतर त्यांच्या पुण्यस्मरण
कार्यक्रमात उपस्थित राहता यावे म्हणून विशेष रेल्वे सोडण्यात येईल.रेल्वेचे काम वेळेत पूर्ण करु. मी आणि मुख्यमंत्री या मार्गाच्या उद्घाटनासाठी रेल्वेतून येऊ.
जातीभेदमुक्त महाराष्ट्र घडवण्याचे काम यापुढे करण्याची गरज आहे. समाज माध्यमातून महापुरुषांची बदनामी करणारे लेखन थांबविण्याची गरज आहे. राज्यातील महापुरषांच्या प्रेरणा सतत मिळाव्यात म्हणून त्यांची भव्य स्मारक उभारण्यात येत आहेत. गोपीनाथराव मुंडे वंचितासाठी जगले तेच काम करीत राहण्याची प्रेरणा घेऊ या, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खा. प्रीतमताई मुंडे यांनी केले. या समारंभाला राज्यभरातून नागरिक उपस्थित होते.