शेतकऱ्यांनी कृषी योजनांचा लाभ घ्यावे-कृषी विकास अधिकारी

0
17

गोंदिया,दि.३ : जिल्हा परिषद गोंदिया कृषि विभागामार्फत सन २०१७ खरीप हंगामात जिल्हा निधी योजनेअंतर्गत ५० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना प्रमाणित भात बियाणे- एमटीयू १०१० व हिरवळीचे खत (ढेंचा बियाणे) पंचायत समिती स्तरावर वाटप होणार आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पंचायत समितीच्या कृषि विभागाकडे संपर्क साधून अर्ज व सोबत सातबारा व नमूना-८अ सादर करावे,असे कृषि विकास अधिकारी वंदना शिंदे यांनी कळविले आहे
जिल्हा निधी अंतर्गत खरीप २०१७ मध्ये डीबीटी नुसार ५० टक्के अनुदानावर रॉकिग स्पेअर नॅपसॅक स्प्रेपंप, बॅटरी ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रेपंप किटकनाशके सिंचनपाईप, ताडपत्री, धान उडवणी पंखे आदी साहित्यासाठी मंजूरी मिळालेल्या शेतकऱ्यांनी खुल्या बाजारातून खरेदी करावयाचा आहे. त्याकरीता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पंचायत समितीचे कृषि विभागाकडे मंजूरीकरीता अर्ज, सातबारा नमूना-८, आधारकार्ड झेरॉक्स प्रत, राष्ट्रीयकृत बँकेची झेरॉक्सप्रत (आधारकार्डचे लिंक झालेले) सादर करावे.
खरीप हंगाम पुर्व मशागत करतांनी जमीन नांगरटीकरुन धसकटे, गवत, झुडपे जाळून टाकावे. पुर्व मशागत अंतर्गत हेक्टरी २५ ते ३० गाड्या कुजलेले शेणखत किंवा कंपोष्ट खत घालावे. पावसाळा सुरु झाल्यानंतर शेतात पाणी साचलेले असतांनी आडवी व उभी नांगरणी करावी. ढेंचा/बोरु यासारखे हिरवळीचे पीक घेवून जमिनीत गाडावे. पेरणी पुर्व बीज प्रक्रिया करावी. बीज प्रक्रियासाठी १० लिटर पाण्यात ३०० ग्राम मीठ (३ टक्के) या प्रमाणात द्रावण करुन त्यात बी ओतावे. द्रावण स्थीर झाल्यावर तरंगणारे हलके रोगयुक्त बी चाळणीने काढून जाळून टाकावे. तळातील बी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून सावलीत २४ तास वाळवावे. पेरणी पुर्वी बियाण्यास थायरम (३ ग्रॅम प्रति किलो) लावून बुरशी नाशकाची प्रक्रिया करावी. सेंद्रीय खते व हिरवळीचे खते यांचा जास्तीत जास्त वापर करावा.
खरीप हंगाम २०१७ सुरु झालेला आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी कृषि निविष्ठा खरेदी करतांना पुढीलप्रमाणे काळजी घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी कृषि निविष्ठा म्हणजे बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके खरेदी करतांना अधिकृत परवानाधारक कृषि केंद्रातून मान्यता प्राप्त कंपनीचे व वाणाचे बियाणे घ्यावे. बियाणे खरेदी करतांना बॅगवर टॅग लावलेले आहे किंवा नाही हे तपासून घ्यावे. बियाणांच्या बॅगवर सिंगल टॅग म्हणजे सत्यदर्शक व डबल टॅग म्हणजे प्रमाणित बियाणे असते.
बियाणांच्या बॅगवर लावलेल्या/छापील टॅगवर लॉट नंबर, अंतिम वापर दिनांक व इतर माहिती नमूद आहे किंवा नाही हे तपासून घ्यावे. खरेदी केलेल्या कृषि निविष्ठाचे पक्के बिल कृषि केंद्र संचालकाकडून प्राप्त करुन घ्यावे व बिलामध्ये लॉट नंबर/बॅच नंबर, प्रती नग किंमत नमूद आहे किंवा नाही हे तपासून घ्यावे. बियाणाच्या पिशवीसह टॅग व पक्के बिल हंगाम संपेपर्यंत सांभाळून ठेवावे. कृषि निविष्ठाच्या बॅग/कंटेनरवर छापील किंमत पेक्षा जास्त रक्कम अदा करु नये. रासायनिक खते खरेदीसाठी शेतकऱ्यांनी आधारकार्ड आणणे आवश्यक आहे. कृषि निविष्ठा बाबत कोणतीही तक्रार असल्यास तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी पंचायत समिती किंवा कृषि विभाग जिल्हा परिषद गोंदिया कार्यालयात संपर्क साधावा. जि.प.कृषि विभाग नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक ०७१८२-२३२४३७ यावर संपर्क करावा.