तीन दिवसांत दूध दरवाढ: महादेव जानकर

0
10

औरंगाबाद ,दि.११- तीन दिवसांत गायीच्या आणि म्हशीच्या दुधाचा दर हा अनुक्रमे २७ आणि ३७ रुपये प्रति लिटर करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी दिली.अनेक संस्था दुधाचा दर वाढवला की डबघाईची भाषा करतात. पण सरकारी मदत घेताना “नाव शेतकऱ्याचे, काम आपले’ हे धोरण आपण अजिबात खपवून घेणार नसल्याची तंबी मंत्री जानकर यांनी दिली.

एका खासगी कार्यक्रमानिमित्त पशुसंवर्धन मंत्री जानकर हे शनिवारी (दि. १०) औरंगाबादेत आले होते. राज्यात गेल्या सरकारपेक्षा लिटरमागे ६ रुपये अधिक दर आपण दिला. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी हे दर वाढवण्यात येत असताना अनेक संस्था या आपण डबघाईला आलो असल्याची भाषा करतात आणि हे वाढीव दर देण्यास असमर्थता दाखवतात. “नाव शेतकऱ्याचे, काम आपले’ जर होणार असेल तर सरकार हे खपवून घेणार नाही. असेच जर होणार असेल तर या संस्थांना अात्तापर्यंत मिळालेली सरकारी मदत कुठे गेली याचा शोध घ्यावा लागेल, असा इशारा या वेळी श्री. जानकर यांनी दिला. राज्य सध्या गायीच्या दुधाचा खरेदी दर हा २४ रुपये तर म्हशीच्या दुधाचा दर हा लिटरला ३० रुपये आहे. हे दर आत २७ आणि ३७ रुपये करण्यात येणार आहे आणि त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपण चर्चा केली असल्याचेही जानकर यांनी सांगितले. औरंगाबेदत शासकीय दूध डेअरीच्या जागेत भव्य मत्स्यालयाची उभारणी करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.